dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #15 on: September 16, 2007, 02:51:00 AM » |
|
शरीर एक कामधेनू-
मानवी शरीर म्हणजे साक्षात कामधेनू आहे. पुराणामध्ये कामधेनूचा उल्लेख केलेला आहे. कामधेनू ही एक गाय आहे व तिचे वैशिष्ट्य असे की, या कामधेनूकडे ज्या कामना कराव्यात त्या सर्व कामनांना फलद्रुप करण्याचे अलौकिक सामर्थ्य त्या गाईत असते. काम म्हणजे कामना आणि धेनू म्हणजे गाय. कामना पूर्ण करणारी धेनू म्हणून तिला कामधेनू असे म्हणतात. अशी ही कामधेनू वशिष्ट ऋषींच्या आश्रमात होती. त्या कामधेनूचा पराक्रम पाहून ती कामधेनू आपल्याला मिळावी अशी विश्वामित्र ऋषींच्या मनात ईच्छा निर्माण झाली. ती कामधेनू विश्वामित्रांच्या स्वाधीन न झाल्यामुळे विश्वामित्र व वसिष्ठ ऋषी यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. अशी पुराणात कथा आहे. जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून प्रत्येक मानवी शरीर हीच एक कामधेनू आहे. परंतु मानव जातीला या कामधेनूची ओळख झालेली नाही, हीच मोठी खेदाची गोष्ट होय. मानवी शरीर हे सर्वांगाने व सर्वार्थाने अलौकिक असे आहे. लहानशा बी मध्ये विराट वृक्ष असतो व त्या बी वर विशिष्ट प्रकारे प्रक्रिया केल्यावर त्या बीचे वृक्षात रूपांतर होते. त्याचप्रमाणे "पिंडी ते ब्रम्हांडी" या म्हणीप्रमाणे ब्रम्हांड पिंडाच्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपात वास करून असते. मानवी शरीराच्या ठायी पंचमहादेव म्हणजेच पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश ही पंच महाभूते, पंचप्राण, पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, अंतरेंद्रिये, सप्तधातू, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, संकल्पशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती असे विविध प्रकारचे दिव्य घटक व विविध प्रकारच्या दिव्य शक्ती मानवी शरीराच्या ठायी वास करतात. त्याचप्रमाणे आनंदस्वरूप जाणीवरूप दिव्य चैतन्य शक्ती मानवाच्या ठिकाणी वास करते. थोडक्यात वरील सर्व घटकांनी युक्त असलेले मानवी शरीर प्रत्यक्षात , अक्षरशः भव्य व दिव्यस्वरूप आहे. एका साध्या अणूमध्ये प्रचंड उर्जा शक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. मग मानवी शरीराच्या ठिकाणी किती सामर्थ्य असेल याची कल्पना केलेली बरी. म्हणूनच जीवनविद्या सांगते की, मानवी शरीर ही कामधेनू आहे. तुम्ही या शरीररूपी कामधेनूकडे ज्या ज्या कामना व्यक्त कराल त्या सर्व कामना फलद्रुप करण्याचे अलौकिक सामर्थ्य या शरीररूपी कामधेनूत आहे. धेनूला किंवा गाईला चारा दिल्याशिवाय व तिची योग्य ती निगा व काळजी घेतल्याशिवाय ती आपल्याला दूध देत नाही, त्याचप्रमाणे शरीररूपी कामधेनूला सतत श्रम किंवा कामरूपी चारा दिल्याशिवाय व तिची योग्य ती निगा व काळजी घेतल्याशिवाय ही शरीररूपी कामधेनू आपल्या कामाला येत नाही. योग्य दिशेने व योग्य कार्यास्तव माणसाने सतत काम करीत राहिले पाहिजे, कष्ट केले पाहिजे व प्रयत्न केले पाहिजे, तरच ही शरीररूपी कामधेनू प्रसन्न होते व माणसाच्या सर्व कामना फलद्रुप करण्यासाठी प्रवृत्त होते. या संदर्भात विश्वामित्रांचे उदाहरण परत घेऊ. कामधेनू प्राप्त होत नाही म्हणून विश्वामित्र नाराज झाले. परंतु भगीरथ प्रयत्न करून याच विश्वामित्रांनी तपश्चर्येच्या बळावर म्हणजे कष्ट व अभ्यास यांच्या सामर्थ्याने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे प्रचंड सामर्थ्य प्राप्त करून घेतले. वसिष्टांच्या कामधेनूपेक्षा विश्वामित्रांची शरीररूपी कामधेनूच सहस्त्रपटीने श्रेष्ठ ठरली. दुर्दैवाची गोष्ट अशी की, मानवी शरीर ही कामधेनू आहे व आपल्या सर्व इष्ट किंवा अनिष्ट कामनाना फलद्रुप करण्याचे अलौकिक सामर्थ्य तिच्या ठिकाणी आहे, याचीच जाणीव मानवजातीच्या ठिकाणी नसल्यामुळे मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.
समर्थ रामदास स्वामी सांगतात-
"उभा कल्पवृक्षातळी दैन्य वाहे घरी कामधेनू पुढे ताक मागे"
या संदर्भात जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिध्दांत आहे तो म्हणजे,
"To work with love, sincerity and honesty is worship of God on the one hand and it is a great service to the nation on the other." याचा अर्थ गोडीने मनापासून व प्रामाणिकपणे काम करणे, म्हणजे प्रत्यक्षात देवाची उपासना व राष्ट्राची सेवा होय. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की अपवाद वगळता माणसे काम करण्यास टाळाटाळ करतात किंवा कसे तरी काम उरकण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक असे करणे म्हणजे सर्वांचीच फसवणूक करणे होय. हे पाप करून माणूस स्वतःला तर फसवितोच शिवाय तो कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला व देवालाही फसवितो. हे पाप निसर्ग देवतेच्या दरबारात दखलपात्र गुन्हा ठरते. "पोटासाठी काम करावयास लागणे" हा निसर्गाचा अटळ नियम आहे. कुठल्याही परिस्थितीत माणसाने पोटासाठी काम केलेच पाहिजे, अशी जर वस्तुस्थिती आहे तर काम टाळण्यात किंवा काम कसे तरी उरकण्यात काय अर्थ आहे बरे? असे केल्याने त्याला स्वतःलाच जीवनात अपयश प्राप्त होऊन त्याचे अनिष्ट परिणाम त्याच्यासकट त्याच्या कुटुंबातील सर्वांना भोगावे लागतात. याच्या उलट "पोटासाठी काम केलेच पाहिजे" असा निसर्गनियमच असल्यामुळे काम करायचे झाले तर रडत-रडत किंवा रखडत-रखडत करण्यापेक्षा हसत-हसत व मन प्रसन्न ठेवून आवडीने काम करणे सहस्त्रपटीने श्रेष्ठ नाही का? असे आवडीने गोडीने काम केल्याने ते काम खूपच चांगले होते व चांगले काम केल्याचे समाधान आपल्याला प्राप्त होते. शिवाय उत्तम काम केल्याने मालक किंवा वरिष्ठ प्रसन्न होतात, जीवनात प्रगती होते, आर्थिक प्रगती सुधारते. आरोग्य चांगले रहाते व त्याचे इष्ट परिणाम त्याच्या कुटुंबावर, समाजावर व राष्ट्रावर होतात. त्याचप्रमाणे उत्तम काम केल्याने शरीररूपी परमेश्वराची उत्कृष्ट सेवा घडते, परिणामी त्याच्यावर परमेश्वरी कृपेचा वर्षाव होतो. कळत किंवा नकळत माणसे या शरीररूपी कामधेनूकडे अज्ञान, अंधश्रध्दा व अहंकार यांच्या आहारी जाऊन अनिष्ट कामना व्यक्त करीत असतात, परिणामी त्या अनिष्ट कामनांना शरीररूपी कामधेनू अनिष्ट प्रतिसाद देते. जाणीवपूर्वक इष्ट व उत्कृष्ट कामनांचा परिपोष करण्याचे ज्ञान बहुतेक लोकांकडे नसते. त्याचमुळे मानवी जीवनात सुख कणभर व दुःख मणभर, अशी परिस्थिती निर्माण होते. थोडक्यात या शरीररूपी कामधेनूकडे इष्ट कामना व्यक्त करायच्या की अनिष्ट कामना व्यक्त करायच्या हे तू ठरवायचे आहे अन्य कोणीही नाही.
म्हणूनच जीवनविद्या सांगते- 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'
|