Jeevanvidya Discussion Forums
February 10, 2012, 01:26:46 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: [1]   Go Down
  Print  
Author Topic: शांतीसुखाचा राजमार्ग-ग्रंथ  (Read 1832 times)
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« on: September 22, 2007, 08:25:28 PM »


श्री. सदगुरूंनी विश्वप्रार्थनेवर लिहिलेला महान ग्रंथ म्हणजे, " शांतीसुखाचा राजमार्ग". तो सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध असावा म्हणून तो येथे देत आहे.
 
             शांतीसुखाचा राजमार्ग-

              लेखक-सदगुरू श्री. वामनराव पै.

             प्रकाशक: जीवनविद्या मिशन


ए-२, सिध्दार्थ नगर, बि. नं. ५ को. ऑप. हौ. सोसायटी, लि. धीरज उपवनच्या समोर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ, बोरीवली (पू), मुंबई- ४०० ०६६,    दूरध्वनी क्र.२८८७ १५/१६,  फॅक्स-२८८४५४८०

९ वी आवृत्ती जानेवारी २००७.  प्रती आता पर्यंत ५, १३०००.
 

                                                                       प्रकाशकाची प्रस्तावना

  सदगुरू श्री. वामनराव पै हे एक थोर तत्वज्ञानी संत, विचारवंत व अलौकिक युगपुरूषच आहेत. प्रपंच आणि परमार्थ यांची सुरेख सांगड घालून त्यांनी जीवनविद्येची निर्मिती केलेली आहे. वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरीत विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या. मानसशास्त्र, परामानसशास्त्र व अध्यात्मशास्त्र या तिन्ही शास्त्रांचा सुरेख संगम जीवनविद्येत झाला आहे. जीवनविद्या ही विज्ञाननिष्ठ, तर्कशुध्द व निसर्ग नियमांवर आधारित असल्याने ती सर्व धर्मातील सर्व लोकांकरिता सारखीच उपयुक्त आहे. जीवनविद्येचे हे तत्वज्ञान धर्मातीत, वैश्विक व शाश्वत असून गरीबांना वरदान, श्रीमंताना आधार व विश्वाला उपयुक्त आहे. जीवनविद्या धर्मातीत आहे कारण तिचा संबंध कुठल्याही धर्माशी नसून मानवी संस्कृतीशी आहे. शाश्वत आहे कारण ती निसर्ग नियमांवर अधिष्ठित आहे व वैश्विक आहे कारण ती विश्वातील सर्व लोकांसाठी उपयुक्त आहे. सदगुरूंची अनेक पुस्तके आम्ही प्रकाशित केली व ती सर्व अत्यंत लोकप्रिय झाली. आता "शांतीसुखाचा राजमार्ग" ही सदगुरू लिखित छोटी पुस्तिका प्रकाशित करण्यात आम्हाला आनंद होत आहे. ही पुस्तिका सुध्दा लोकप्रिय होईल याची आम्हाला खात्री वाटते. प्रस्तुत छोट्या पुस्तिकेत जीवनविद्येची शिकवण संक्षिप्त स्वरूपात सादर केलेली आहे. ही पुस्तिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी, त्यात शिकविलेला शांतीसुखाचा राजमार्ग लोकांनी अनुसरावा व ते सुखी व्हावेत, याच एकमेव उद्देशाने प्रस्तुत पुस्तिका प्रकाशित करीत आहोत. सदगुरू हे कार्य निरपेक्षपणे व अव्याहतपणे करीत आहेत. ते प्रबोधन करतात पण बिदागी घेत नाहीत, ग्रंथ लेखन करतात पण रॉयल्टी घेत नाहीत , अनुग्रह देतात पण गुरूदक्षिणा घेत नाहीत. त्याचप्रमाणे जीवनविद्यामिशनमध्ये कार्य करणारे सदगुरूंचे शिष्यसुध्दा समाजसेवेचे हे कार्य कमिशन न घेता केवळ मिशन म्हणूनच करतात. आमची वाचकांना नम्र विनंती आहे की त्यांनी ही पुस्तिका एकदा वाचून बाजूला ठेवू नये, तर ती वारंवार वाचनात ठेवावी, जेणेकरून त्यातील बोध आत्मसात करून आचरणात आणणे त्यांना सुलभ होईल. त्याचप्रमाणे आमची वाचकांना आणखी एक विनंती आहे की, जीवनविद्येचे शास्त्र उत्तमप्रकारे समजावून घेण्यासाठी त्यांनी सदगुरूंची प्रकाशित झालेली अन्य पुस्तके अभ्यासपूर्वक वाचावीत. शिवाय सदगुरूंच्या प्रबोधनाच्या प्रकाशित झालेल्या कॅसेटस् व सी. डी. जनताजनार्दनाला आवडतील अशी आम्हाला आशा वाटते.

                                                            जीवनविद्या मिशन-मुंबई   

 
« Last Edit: January 31, 2008, 12:45:57 AM by dr.nutanpol » Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #1 on: September 22, 2007, 08:33:29 PM »

                                                                          शांती सुखाचा राजमार्ग     

   या जगात माणूस एक दिवस अवतीर्ण होतो आणि काही वर्षांनी तो एक दिवस अंतर्धान पावतो. अवतीर्ण होणे म्हणजे जन्म घेणे व अंतर्धान पावणे म्हणजे मृत्यू पावणे. जन्म आणि मृत्यू या दोहोंच्या मध्ये जे, ते माणसाचे जीवन असते. बहुतेक सर्व लोकांचा या जीवनासंबधी अनुभव "सुख जवा एवढे व दुःख पर्वताएवढे"   असा असतो. "नको नको संसार शिरावरी भार" असाच अनुभव सामान्यपणे सामान्य लोक घेत असतात. जेथे परिणाम आहे तेथे कारण हे असतेच. असा निसर्ग नियम आहे. संसारात सुख थोडे व दुःख प्रचंड अशी परिस्थिती निर्माण होते त्याला कारण हे असलेच पाहिजे. त्याप्रमाणे माणूस या पृथ्वीवर जन्माला येतो. या घटनेला सुध्दा कारण हे असलेच पाहिजे. दुर्दैवाने माणसे एकतर कारण शोधण्याचा प्रयत्न करीत नाहीत किंवा ते शोध करतात ते भलत्याच दिशेने. आग लागली रामेश्वरला व बंब चालले सोमेश्वरला असाच प्रकार सर्वसाधारणतः मानवी जीवनात घडत असतो. त्यामुळे मुळातच बिघडलेली परिस्थिती अधिकच चिघळत जाते. या संदर्भात जीवनविद्येचा मौल्यवान सिध्दांत असा आहे की, "आनंद वाटता वाटता आनंद लूटण्यासाठीच माणूस जन्माला येतो. सामान्य पध्दत अशी की, प्रथम लुटायचे आणि मग वाटायचे. परंतु येथे पध्दतच वेगळी आहे. येथे वाटत वाटत लुटायचे" असा प्रकार आहे. हा सिध्दांत म्हणजे मानव जातीला होकायंत्रासारखा आहे. सागरात प्रवास करताना होकायंत्र उत्तर दिशा दाखवतो. त्यामुळे प्रवास व्यवस्थित होतो. त्याचप्रमाणे वरील सिध्दांत मानवाला त्याच्या जीवन प्रवासात माणसाने जीवन जगावे कसे? या प्रश्नाला व त्याच्या इतर सर्व समस्यांना उत्तर देत असतो. माणसाच्या जीवनात जे कलह, क्लेश, संकटे, दुःख वगैरे अनिष्ट गोष्टी निर्माण होतात त्याचे, अपवाद वगळता मुख्य कारण एकच असते आणि ते म्हणजे "आनंद  वाटता वाटता  आनंद  लुटायचा" या  सिध्दांतासंबंधी माणसाला असलेले अज्ञान हे होय. वास्तविक हा आनंद आपल्या "स्व" मध्येच कायम वास करून असतो, म्हणूनच त्याला स्वानंद असे म्हणतात. हा स्वानंद आपले स्वरूप आहे, परंतु याचीच आपल्याला विस्मृती झालेली आहे. या विस्मृतिलाच "भ्रम" असे म्हणतात. स्वानंद आपले स्वरूप आहे  याचाच अर्थ तो स्वानंद आणि आपण एकच आहोत. आज आपली परिस्थिती विचित्र झालेली आहे. जो आनंद आपणच आहोत तोच आनंद आपण जगाच्या पाठीवर शोधत आहोत. जेंव्हा आपण आनंदाचा शोध करू लागतो तेव्हाच आपल्या दुःखाला सुरवात होते. या प्रकारालाच भवसागर किंवा संसारसागर असे म्हणतात. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की, स्वानंदातून आपला उदय होतो, स्वानंदात आपले वास्तव्य असते,  स्वानंदात आपण जीवन जगत असतो,  स्वानंदात आपला लय होतो व पुन्हा स्वानंदातुन आपला उदय होतो. अशी वस्तुस्थिती असुन सुध्दा परिस्थिती मात्र त्याच्या अगदी उलट आहे. "जन्म दुःखरूप आहे, जीवन जगणे म्हणजे महाताप आहे, जग म्हणजे अळवावरचे पाणी व मृत्यू म्हणजे दुःखाच्या साम्राज्यात प्रवेश करणे" अशीच सर्वसामान्य लोकांची कल्पना आहे. पोट भरण्यासाठी व जीवनाच्या आवश्यक त्या गरजा भागविण्यासाठी माणसाला पैसा लागतो व त्यासाठी कष्ट करावेच लागतात, कारण तो निसर्गाचाच संकेत आहे. म्हणून जीवनविद्या सांगते - "To work with love and sincerity is worship of God." परंतु आनंदी-सुखी जीवनासाठी कष्ट करावयाचे नसतात किंवा त्यासाठी सत्ता-संपत्ती-पैसा यांचीही आवश्यकता नसते, तर त्यासाठी लागते ते फक्त एकच आणि ते म्हणजे "शहाणपण" हे होय. "शहाणपणाचा प्रभाव तेथे सुखाचा सुकाळ व जेथे शहाणपणाचा अभाव तेथे दुःखाचा सुकाळ" असा जीवनविद्येचा सिध्दांत आहे. जगात सर्वत्र दुःखाचा महापूर आलेला दिसतो याचे मुख्य कारण म्हणजे शहाणपण नावाची गोष्टच दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेली आहे. श्रवण नाही, वाचन नाही, चिंतन नाही, अभ्यास नाही, मार्गदर्शन नाही. अशा परिस्थितीत शहाणपण येणारच कसे? उलट मौज-मजा करणे व चैन-चंगळ करणे व त्यासाठी अमाप पैसा वाटेल त्या मार्गाने मिळवणे, हेच माणसाच्या जीवनाचे ध्येय झालेले आहे. हा मार्ग म्हणजे प्रत्यक्षात दुःख वाटता वाटता दुःख भोगण्याचा आहे. याचा "साक्षात्कार" लोकांना फार उशीरा होतो. अनिष्ट व भ्रष्ट मार्गांनी घरांत येणारा पैसा हा एकटाच येत नाही तर तो टेन्शन , शारिरीक-मानसिक रोग, मनःस्ताप, दुःख, समस्या व संकटे या सर्व लवाजम्यासहित घरात प्रवेश करतो. त्याचप्रमाणे संपादित केलेली गडगंज संपत्ती मुलांच्या बुध्दीला गंज चढवते, गांजा अफू, दारू-गर्द अशा अनिष्ट व्यसनांच्या आहारी नेते आणि सरते शेवटी त्यांना रसातळाला नेऊन पोहोचविते. या मार्गाने जाणारी माणसे स्वतःला तर दुःखाच्या खाईत लोटतातच पण स्वतःच्या कुटुंबाला, समाजाला व राष्ट्राला दुःखाला दरीत ढकलून सर्वनाशाला निमंत्रण देतात. तात्पर्य, आनंदी-सुखी जीवनासाठी शहाणपण आवश्यक आहे. येथे एक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे व तो म्हणजे "शहाणपण" नेमके कशात आहे?  जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून "शहाणपण कशात आहे" याचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे-

१)  सत्यं-शिवं-सुंदरं असा परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही व नुसती शक्ती नाही. निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. असा हा परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप असून चैतन्यशक्तीचा विराट-अनंत सागर  आहे. ही अव्यक्त चैतन्यशक्ती "अनंत रूपे अनंत वेषे" विश्वरूपाने "नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था" या स्वरूपात व्यक्त झाली. अशा प्रकारे सर्वेश्वर सर्वत्र सर्व प्राणिमात्रात व वस्तुमात्रात वास करून व सर्वांना व्यापून राहिलेला आहे. विश्वाचे रहाटगाडगे व्यवस्थित चालण्यासाठी विश्वातील सर्वभूतमात्र अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहेत. "ईश्वर सर्व भूतमात्रांत आहे" हा सिध्दांत "निसर्ग रक्षण व पर्यावरण संरक्षण" या अत्यंत महत्वाच्या विषयाशी कसा संलग्न व निगडित आहे, हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात येईल. म्हणून अंधश्रध्देच्या आहारी न जाता परमेश्वराचे हे रूप आणि स्वरूप अभ्यासपूर्वक लक्षात घेऊन निसर्ग नियमांशी सुसंगत जगण्याची कला साध्य करून घेण्यात माणसाचे हित व कल्याण आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.

२) जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्वशक्तीमान परमेश्वर एकच असून तो कोणावरही कृपा किंवा कोप करीत नाही, तर   नाही, तर केवळ माणूसच स्वतःच्या सत्कर्मांनी व दुष्कर्मांनी स्वतःवरच कृपा किंवा कोप करीत असतो. म्हणून आपले कल्याण साधण्यासाठी माणसाने दुष्कर्म टाळून सत्कर्म करणे आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.

३) आपण दुसऱ्यांना जे सुख किंवा दुःख देतो ते सुख-दुःख आपणाकडे बुमरॅंग होऊन न चुकता परत येते, हा निसर्गाचा अटळ नियम नीट लक्षात  घेऊन  जीवन जगण्यात खरे "शहाणपण" आहे.       
     
४) साक्षात् परमेश्वराने स्वतःच्या हाताने स्वतःची निर्माण केलेली जीवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर असून ते आश्चर्यांचे आश्चर्य व असंख्य चमत्कारांचे आगर आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या जीवंत मूर्तीला, दारू-गुटखा-गर्द-तंबाखू यांचा नैवेद्य अर्पण केला तर त्या मूर्तीकडून तसाच प्रतिसाद मिळून माणसाला भय़ंकर शारिरीक व मानसिक रोग जडतात व सरतेशेवटी त्याचा पूर्ण सत्यानाश होतो. परंतु याच मूर्तीला जर पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी व सुसंस्कार यांचा नैवेद्य अर्पण केला तर, माणसाला शारिरीक व मानसिक आरोग्य, आनंद, यश व समाधान प्राप्त होऊन त्याच्या जीवनाचे नंदनवन होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. 

५)   देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नांत आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापक्षाही श्रेष्ठ होय. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.       
 
६) "माणसांनी माणसांबरोबर माणसांसारखे वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे" हेच आहे देवाचे भजन-पूजन, तीच आहे देवाची भक्ती-उपासना आणि तोच आहे खरा धर्म. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.   
   
७) कर्माचे फळ कर्मातच असते हा निसर्ग नियम होय, म्हणून तुम्ही जर इतरांचे भले कराल तर सुख तुमचे भले होईल व जर तुम्ही दुसऱ्यांचे वाटोळे कराल तर तुमचे वाटोळे होईल हे निश्चित. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. 

८) दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न कराल तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल याच्या उलट स्वतः सुखी होण्याच्या प्रयत्नात इतरांना दुःख द्याल तर ते दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. 

९) "इतरांच्या सुखांत आपले सुख लपलेले आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखांत आपले दुःखात आपले लपलेले आहे". ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. 

१०) ज्या घरांत स्त्रियांचा छळ होतो, तेथे दैन्य आणि दुःख कायम वास करतात याच्या उलट "गृहलक्ष्मीकडे "लक्ष्मी"या भावनेने पहाणे, हा ऐश्वर्यलक्ष्मीला घरात स्थिर करण्याचा राजमार्ग होय"  ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.   

११) मानवी शरीर हा एक अलौकिक कॉम्प्युटर असून तुम्ही त्याला "शुभ किंवा अशुभ विचार-उच्चार-आचार " यांच्या द्वारा जे शुभ किंवा अशुभ फिडींग कराल त्याप्रमाणे तुम्हाला सुख दुःखाची फळे प्राप्त होतील ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.   

१२) देवाधर्माच्या नावाखाली अन्य धर्मीयांवर अत्याचार, बलात्कार, तंटे-बखेडे, दंगे-धोपे, युध्द-लढाया, वगैरे अनिष्ट गोष्टी घडतात. अशा अनिष्ट गोष्टी घडण्यास काही राजकीय पुढारी साथ देतात. हा सर्व प्रकार "धर्म" या पवित्र संकल्पनेला कलंकित करणारा असून अखिल मानवजातीच्या तोंडाला काळिमा फासणारा आहे. म्हणून जीवनविद्या सांगते, परमेश्वर एक आहे, मानवजात एक आहे, मानवी मन एक आहे, मानव धर्म एक आहे, मानवी संस्कृती एक आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विश्वमानवाच्या विश्वशांतीचे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सर्वांनी प्रयत्न करण्यात खरे शहाणपण आहे.

१३) मानवी जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग किंवा घटना सर्वांवरच येत असतात, मग तो पंत असतो, महंत असो, संत असो किंवा भगवंत असो यापैकी नव्वद टक्के घटना माणसाच्या स्वाधीन असतात तर दहा टक्के घटना पराधीन असतात. परंतु सामन्य लोकांचा असा गैरसमज आहे की, मानवी जीवनात सर्वच घटना पराधीन असतात. म्हणून दैववादाचा त्याग करून प्रयत्नवादाची कास धरण्यात खरे शहाणपण आहे.

१४) संगत धरण्यात माणसे बेसावध असतात. माणसांना ज्याप्रमाणे चांगली किंवा वाईट संगती मिळते, त्याप्रमाणे त्यांना इष्ट किंवा अनिष्ट विचारांची लागण होऊन, त्याचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. म्हणून  संगत धरण्यात माणसाने अत्यंत सावध  असले पाहिजे, कारण पूर्ण सत्यानाश करण्याचे किंवा सत्याचा साक्षात्कार करून देण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.         

१५) जीवनात अपयशाचे प्रसंग काही वेळा निर्माण होतात. अपयश आले तर त्यात जगावेगळे काही घडले असे नाही म्हणून अपयश आले तर खचून जाण्याचे मुळीच कारण नाही. अपयश येत नाही कोणाला? जगात जी मोठी माणसे झाली ती सर्व अपयशाच्या माथ्यावर पाय देऊनच यशाच्या शिखरावर गेली. अपयश आले त्याला कारण आपले प्रयत्न तोकडे पडले किंवा योग्य दिशेने झाले नाहीत, हे लक्षात घेऊन उत्तम मार्गदर्शनाखाली पुन्हा जिद्दीने प्रयत्नांची कास धरली पाहिजे. शंकराने विष पचवले व जगाला अमृत दिले म्हणून त्याला महादेव असे म्हणतात. त्याप्रमाणे अपयशाचे विष पचवून जो यशाच्या शिखराकडे झेप घेतो त्याला महापुरूष असे म्हणतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खर शहाणपण आहे.   

  थोडक्यात, माणसाजवळ जर एक शहाणपण नसेल तर त्याला सुखी करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष ब्रम्हदेवालासुध्दा नाही. शहाणपण व मुर्खपण कशात आहे, हे एका वाक्यात खालीलप्रमाणे करता येईल-

  "शुभ कर्मांच्याद्वारे शुभनियती निर्माण करण्यात खरे शहाणपण आहे तर अशुभ कर्मांच्याद्वारे अशुभ नियती निर्माण करण्यात मुर्खपणाचा कळस आहे."
« Last Edit: January 31, 2008, 12:44:22 AM by dr.nutanpol » Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #2 on: September 22, 2007, 08:53:45 PM »

 
 माणूस त्याच्या स्वतःच्याच विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारे निसर्गनियमांना गती देतो व त्या गतीतून जी निर्मिती होते तिला नियती असे म्हणतात, आणि त्यानेच निर्माण केलेली त्याचीच शुभ किंवा अशुभ नियती त्याच्या सुख-दुःखाला कारणीभूत ठरत असते. आपण जेंव्हा आरशात पहातो तेंव्हा आपल्याला आरशात आपले प्रतिबिंब दिसते. आपण जशा बऱ्या-बुऱ्या किंवा चांगल्या-वाईट हालचाली करतो त्याप्रमाणे आरशातील प्रतिबिंब तशाच प्रकारे हालचाली करते. आपण जर हात जोडले तर  आरशातील प्रतिबिंब आपल्याला हात जोडते. याच्या उलट आपण जर हात उगारला तर  आरशातील प्रतिबिंब आपल्यावर  हात उगारते. नेमका तोच प्रकार मानवी जीवनात घडत असतो. आपण ज्या जगात रहातो ते जग, हा एक मोठा आरसा आहे. जीवन जगत असताना आपण जे करतो, बोलतो, वागतो त्याचप्रमाणे जगाकडून आपल्याला प्रतिसाद मिळत असतो. जशी आपण क्रिया करू तशीच प्रतिक्रिया जगाकडून आपल्याला मिळत असते. तुम्ही एखाद्याला अहो म्हंटले तर तो दुसरा माणूस तुम्हाला काहो म्हणेल. परंतु तुम्ही त्याला अरे म्ह्टले तर तो तुम्हाला काय रे म्हणेल. तुम्ही एखाद्याचा सन्मान केला तर तो तुमचा सन्मान करील पण तुम्ही त्याचा अपमान केला तर तो सुध्दा तुमचा अपमान करील.  थोडक्यात, ज्या इष्ट किंवा अनिष्ट पध्दतीने वागाल त्याचप्रमाणे जगाकडून इष्ट किंवा अनिष्ट पध्दतीनेच प्रतिसाद मिळेल. जगाचा इतिहास पाहिला तर क्रिया तशी प्रतिक्रिया या न्यायानेच आतापर्यंत सर्व घटना घडत आलेल्या आहेत. रामायण व महाभारत घडले ते सुध्दा याच पध्दतीने म्हणूनच डॉ. मर्फी सांगतात-

The good you do to others comes back to you in like measure and the evil you do to returns to you by the law of your own mind.

    असे असून सुध्दा मानवजात इतिहासापासून काहीही धडे शिकली नाही. म्हणूनच जीवनविद्या सांगते गत गोष्टीपासून जे धडे शिकत नाहीत ते गधडे होय. म्हणून शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शुभ बोलणे व शुभ करणे यातून शुभ नियती निर्माण केल्याने आनंद वाटता-वाटता आनंद लुटण्याची कला साध्य होते. वीज डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, हाताने तिला स्पर्श करता येत नाही, नाकाने तिचा वास घेता येत नाही व जीभेने तिला चाखता येत नाही. तरी सुध्दा वीज अस्तित्वात आहे व तिचा पुरवठा "वायर" मधून करता येतो. त्याचप्रमाणे "सच्चिदानंद" हे आपले स्वरूप असून स्वानंद आपल्यातच असतो पण तो वीजेप्रमाणे ज्ञानेंद्रियांना आकळता येत नाही. असे जरी असले तरी या स्वानंदाचा पुरवठा "शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शुभ बोलणे व शुभ करणे" या वायरमधून सर्वांना करता येतो. इतकेच नव्हे तर जो आनंद आपण सर्वांना देऊ, तोच आनंद बुमरॅंग  होऊन सहस्त्र पटीने आपल्याकडे परत येईल व आपल्या जीवनात आनंदाची लयलूट करील. विशेष म्हणजे, हे सर्व जगातील प्रत्येक माणसाला स्वतःचे काहीही नुकसान न करून घेता आचरणात आणणे शक्य आहे. ज्या वायरमधून स्वानंदाचा सर्वांना पुरवठा करावयाचा ती वायर खालील विश्वप्रार्थनेच्या रूपात शब्दबध्द केली आहे.

  " हे ईश्वरा,
  सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
  सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, 
  सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर, 
  आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे"   


   या विश्वप्रार्थनेत "शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे, शुभ बोलणे व शुभ करणे" या चारही गोष्टी समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे "विश्वप्रार्थना करणे" ही एक उत्कृष्ठ साधना असून उत्तम उपासना आहे. भक्तीयोग, कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग, हटयोग असे हे सर्व योग विश्वप्रार्थनेत वास करतात. त्याचप्रमाणे "शुभ चिंतन करणे" हेच ध्यान , "शुभ इच्छा करणे" हीच प्रार्थना, "शुभ बोलणे" हेच भजन व "शुभ करणे" हेच पूजन होय. साधनेचे व उपासनेचे हे सर्व प्रकार विश्वप्रार्थनेत समाविष्ट असल्यामुळे, विश्वप्रार्थना करणाऱ्यांना अगणित पुण्याची प्राप्त होते. संसार सुखाचा करण्यासाठी पैसा जितका आवश्यक असतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पुण्य आवश्यक असते. परमार्थात चांगली प्रगती साधण्यासाठी सुध्दा पुण्य पाहिजे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, अर्थ, स्वार्थ, परार्थ व परमार्थ हे सर्व सर्वार्थाने साध्य व सिध्द करण्यासाठी विश्वप्रार्थना हा रामबाण उपाय आहे. या विश्वप्रार्थनेने आपण स्वानंदाचे प्रक्षेपण सर्वत्र करीत असतो. स्वानंदस्वरूप  शुभ चिंतनाने सूक्ष्म विचारांचे आनंद स्पंद आपण कळत नकळत सर्वत्र प्रसृत करीत असतो व तेच आनंदस्वरूप विचारांचे आनंदस्पंद बुमरॅंग होऊन विविध रूपाने आपल्याकडे परत येऊन आपल्यावर आनंदाची बरसात करतात. हे सर्व घडते ते, "क्रिया तशी प्रतिक्रिया" या निसर्ग नियमाप्रमाणे. या संदर्भात फ्रेंच फिलॉसाफर जेम्स ऍलन सांगतात-   
 
As you alter your thoughts towards things and other people, the things and other people will alter towards you, The divinity that shapes your ends is in your own self. All that you achieve is the direct result of your own thoughts.

     या विश्वप्रार्थनेत ईश्वर स्मरण आहे, त्याचप्रमाणे सुंदर विचार आहेत. विचारांचे सामर्थ्य प्रचंड आहे. माणसाचे भले करण्याचे किंवा वाटोळे करण्याचे सामर्थ्य विचारशक्तीत आहे. माणसाचे जीवन घडवण्याचे किंवा बिघडवण्याचे सामर्थ्य विचारात आहे. त्याचप्रमाणे माणसाचे शरीर ही एक विस्मयकारक रसायनशाळा आहे. या मानवी शरीरात असंख्य रासायनिक प्रक्रिया सतत घडत असतात व त्यांचा शरीरप्रकृतीवर व जीवनावर परिणाम होत असतो. विशेष म्हणजे या रासायनिक प्रक्रियांवर विचारांचा फार मोठा प्रभाव पडत असतो. माणसाच्या मनात घोळत असणारे इष्ट किंवा अनिष्ट विचार या रासायनिक पक्रियांना विशिष्ट पध्दतीने गती देतात व त्यामुळे इष्ट किंवा अनिष्ट शक्ती जागृत होऊन, त्याला सुखी किंवा दुःखी जीवन प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरतात. या संदर्भात नॉर्मन पील सांगतात-

    Positive thinking sets in  motion positive forces which bring positive results to pass.

याच्या उलट प्रकार अनिष्ट चिंतनाने घडतो. थोडक्यात "साकार झालेले विचार" म्हणजेच माणसाचे जीवन होय. बाकीचे सर्व तुम्हाला एकवेळ सोडून जातील पण विचार मात्र आयुष्यभर तुम्हाला चिकटून राहतील. विचारांचा महिमा वर्णन करण्यासाठी शब्दच अपुरे पडतात. असे जरी असले तरी विचारांचे महत्त्व व सामर्थ्य थोडक्यात वर्णन करणे इष्ट वाटते.

१) जीवनविद्या सांगते की, "विचार" हा अखिल विश्वाचा सम्राट आहे. हा विचारच अखिल विश्वावर आपली सत्ता गाजवत असतो. कल्याण करणे किंवा संपूर्ण सत्यानाश करणे या दोन्ही गोष्टी घडवून आणण्याचे प्रचंड सामर्थ्य या विचाररूपी सम्राटात आहे. मानवी जीवनाचा इतिहास अभ्यासिला तर असे आढळून येईल की, या विचाररूपी सम्राटानेच अविचाराच्या आधीन होऊन जगात सर्वत्र गोंधळ, वादळ, दुःख, अत्याचार, दुराचार, बलात्कार, युध्द-लढाया अशा अनिष्ट गोष्टींनी थैमान घातले. याच्या उलट  विचाररूपी सम्राटाने सुसंस्कृत विचारांच्या आधीन होऊन जगात सुख,शांती, समृध्दी, स्थैर्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

२) विचार हा ईश्वर आहे. First there was thought and thought was God. असा जीवनविद्येचा सिध्दांत आहे. याचाच अर्थ असा की, विचार हा ईश्वर आहे. आपण कुठेही जरी गेलो तरी हा विचाररूपी ईश्वर आपल्याबरोबर असतो. विचार हा ईश्वर आहे याचाच अर्थ असा की, "विचार" हा चैतन्यशक्तीस्वरूप आहे. शक्ती म्हंटली की तिच्यात भले करण्याचे किंवा वाटोळे करण्याचे, दोन्ही प्रकारचे सामर्थ्य असते.

३) विचार गंगोत्री आहे. गंगा नदीच्या उगमस्थानाला गंगोत्री असे म्हणतात मानवी जीवनरूपी नदीचे उगमस्थान विचार आहे म्हणून "विचार" ही मानवी जीवनाची गंगोत्री आहे. गंगा नदी उगमस्थानी अत्यंत छोटी असते परंतु तीच नदी पुढे वहाता वहाता विराट नदीच्या पात्राचे स्वरूप धारण करते. त्याचप्रमाणे मानवी जीवनाच्या उगमस्थानी विचारांचे पात्र लहान असते. परंतु हेच विचार वाहात वाहात मानवी जीवनाचे विराट पात्र या स्वरूपात प्रकट होतात. विचारांचेच रूपांतर उच्चार व आचारांत होऊन मानवी जीवनाचे विशाल पात्र निर्माण होते. परंतु नदीच्या उगमस्थानिच जर पाणी दुषित झाले तर नदीच्या पाण्याचा पुढील प्रवाह सुध्दा दुषित होण्याचा दाट संभव असतो. त्याचप्रमाणे विचार ही माणसाच्या जीवनाची गंगोत्री असल्यामुळे मुळात विचार जर बिघडले तर त्याचे संपूर्ण जीवनच बिघडण्याचा दाट संभव असतो. "माणूस बिघडला किंवा समाज बिघडला" असे आपण जेंव्हा म्हणतो तेंव्हा त्याचा अर्थ माणसाचे किंवा समाजाचे विचार बिघडले असा असतो.

४) विचार हा अल्लाउद्दीनचा दिवा आहे. अल्लाउद्दीनच्या दिव्याची एक गोष्ट अशी सांगतात की, अल्लाउद्दीनला एक काही कारणांमुळे जादूचा दिवा सापडला. अल्लाउद्दीनने दोन हाताने दिवा विशिष्ट प्रकारे घासला की त्या दिव्यातून एक राक्षस निर्माण होऊन तो अल्लाउद्दीनची सर्व बरी-वाईट कामे करीत असे."विचार" हा सुध्दा माणसाला गवसलेला एक जादूचा दिवा आहे. माणसाने बहिर्मन व अंतर्मन या दोन हातांनी, हा विचाररूपी जादूचा दिवा, विशिष्ट प्रकारे हाताळला तर त्या विचारातून एक शक्ती निर्माण होऊन ती त्याला सर्व प्रकारे साथ देते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, "विचार" हा जादूचा दिवा आपल्याजवळ आहे हेच माणसाला ज्ञात नाही व तो जादूचा दिवा विशिष्ट प्रकारे हाताळण्याची कलाही त्याला अवगत नाही.

५) विचार हा अभिषेक आहे. शिवलिंगावर किंवा देवाच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची काही संप्रदायामध्ये प्रथा आहे. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी असा अभिषेक केला जातो. जीवनविद्येच्या द्दष्टीकोनातून असा अभिषेक करण्याची आवश्यकताच नाही कारण, जगातील प्रत्येक माणूस त्याच्या कळत नकळत आयुष्यभर अभिषेक करीत असतो. माणसाच्या डोक्यात शुभ किंवा अशुभ विचारांचे कारंजे सतत उडत असतात व त्यांचा अभिषेक माणसाच्या ह्दयातील आत्मलिंगावर किंवा ह्दयस्थ ईश्वरावर सतत होत असतो.  शुभ  विचारांचा अभिषेक झाला तर माणसाचे जीवन सुखी व यशस्वी होते. याच्या उलट अशुभ  विचारांचा अभिषेक झाला तर त्याचे जीवन दुःखी, अपयशी व वैफल्यग्रस्त होते. ही वास्तवता लक्षात घेऊन सुखी जीवनासाठी अशुभ  विचारांचा अभिषेक टाळून शुभ  विचारांचा अभिषेक सतत होत राहील याची काळजी घेतली पाहिजे व त्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

६) विचार ही आपली मुले आहेत. आपणच आपल्या मुलांना जन्म देतो व लहानाची मोठे करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करतो. ही मुले चांगली निपजली तर आई-बापांना सुख देतात याच्या उलट हीच मुले दुर्वर्तनी निपजली तर आई-बापांच्या दुःखाला कारणीभूत  ठरतात. अगदी त्याचप्रमाणे आपणच आपल्या विचारांना जन्म देत असतो. राजा धृतराष्ट्राला शंभर मुले होती पण आपल्याला विचाररूपाने असंख्य मुले असतात. त्याचप्रमाणे आपणच या विचारांची कळत नकळत जोपासना करून त्यांना अधिक प्रबळ करीत असतो. या असंख्य विचारांपैकी जे सुंदर व सुरेख विचार असतात ते आपल्याला सुख, शांती, समाधान देतात. याच्या उलट जर आपण अनिष्ट विचारांची कळत नकळत जोपासना केली तर तेच अनिष्ट विचार आपल्या जीवनात अरिष्ट निर्माण करण्यास व अनिष्ट परिस्थिती घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात.

७) विचार हे आपले वृक्ष आहेत, आपण जमिनीमध्ये झाडे लावतो, त्यांना खतपाणी घालतो, त्यांच्या संरक्षणासाठी कुंपण घालतो व त्यांची योग्य ती काळजी घेतो. त्यामुळेच ही झाडे मोठी होतात व आपल्याला फुले, फळे व सावली देऊन आनंद देतात. वास्तविक हे वृक्ष म्हणजे शंकराचे अवतारच आहेत, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. कारण शंकराने स्वतःसाठी विष ठेवले व जगाला अमृत दिले, त्याचप्रमाणे हे वृक्षराज स्वतःसाठी विषारी कार्बन डाय ऑक्साईड वायु ठेवतात व आपल्याला आपल्या आरोग्यासाठी व जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असा अमृतरूप ऑक्सिजन देतात परंतु जर आपण या वृक्षांकडे दुर्लक्ष केले, त्यांची योग्य ती काळजी घेतली नाही, त्यांना खतपाणी दिले नाही, तर हे वृक्ष आपल्याला फुले, फळे व सावली व ऑक्सिजन देऊ शकणार नाहीत. अगदी त्याचप्रमाणे विचार हे आपले वृक्ष आहेत, आपण शेतकरी आहोत व आपले अंतर्मन हे शेत आहे. या अंतर्मनाच्या शेतात शुभ विचाररूपी वृक्षांची पेरणी केली पाहिजे, त्यांच्यावर शुभ चिंतनाचे सिंचन केले पाहिजे, शुभ उच्चार- आचारांचे खत दिले पाहिजे. आणि ह्या विचाररूपी वृक्षांची योग्य ती योग्य ती काळजी घेऊन त्यांची जोपासना केली पाहिजे.  असे केले तरच हे विचाररूपी वृक्ष आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद व सुयश देतील, याच्या उलट या विचाररूपी वृक्षांकडे दुर्लक्ष केले, त्यांची योग्य ती काळजी घेतली नाही व त्यांची उत्तमप्रकारे जोपासना केली नाही तर या विचाररूपी वृक्षांना कीड लागेल व सर्व वातावरण बिघडविण्यास ते कारणीभूत ठरतील.

थोडक्यात, विचार हा चैतन्यशक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. जीवनाचे वाळवंट करण्याचे किंवा नंदनवन करण्याचे प्रचंड सामर्थ्य विचारांत आहे. या संदर्भात डॉ. मर्फी सांगतात-

The law of your subconscious mind  works for good and bad ideas alike. The law when applied in negative is the cause of failure, frustration and unhappiness. However if your habitual thinking is harmonious and constructive, you will experience success, prosperity and perfect health.

   जसे विचार त्याप्रमाणे जीवनाला आकार प्राप्त होतो. विचारांचेच परिवर्तन उच्चार व आचार यामध्ये होत असते, म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. तुम्ही जरी विचारांचा विचार केला नाही तरी विचार मात्र तुमचा विचार करतात व तेच तुमच्या सुख-दुःखाला कारणीभूत ठरतात. मानवी जीवनात विचारांचा पगडा जबरदस्त असून, हे विचारच माणसाच्या डोक्यावर सुखदुःखाची पगडी ठेवीत असतात. या संदर्भात फ्रेंच फिलॉसाफर एपिक्टेटस सांगतात,

You ought to be more concerned about removing wrong thoughts from your mind than removing tumours and abscesses from your body.       

 
« Last Edit: January 31, 2008, 12:48:29 AM by dr.nutanpol » Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #3 on: September 22, 2007, 09:11:00 PM »

या संदर्भात "विचार प्रदुषण" हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अखिल मानवजातीसमोर एक महत्त्वाचा प्रश्न, यक्षप्रश्न म्हणून उभा आहे, तो म्हणजे प्रचंड प्रमाणावर निर्माण होणारे विचार प्रदुषण व त्याचे मानवजातीवर   होणारे अनिष्ट परिणाम हे होय. देवा-धर्मासंबंधी अज्ञान व अंधश्रध्दा, संस्कृतीसंबंधी विकृत अहंकार, पापपुण्यासंबंधी खुळचट समजूती, वंश-पंथ-जात यासंबंधी दुराभिमान, सत्ता-संपत्तीचा भयानक लोभ अशा या सर्व अनिष्ट प्रकारांतून माणसा-माणसांत निष्कारण मत्सर, द्वेष, तिरस्कार, दुराग्रह, दुरावा, भिती निर्माण होऊन त्यातून भयानक विचार प्रदूषण जन्माला येते. हे विचार प्रदुषणच माणसा-माणसांत कलह, कलागती, क्लेश, खून, रक्तपात, तंटे-बखेडे, दंगे-धोपे, युध्द-लढाया निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. बाकीची सर्व प्रकारची प्रदुषणे मानवजातीला ज्ञात आहेत व त्यावर उपाय सुध्दा करण्याचे प्रयत्न होतात परंतु विचार प्रदुषण होते व ते मानवजातीवर आलेले फार मोठे संकट आहे. याची पुरेशी जाणीव बहुतेक लोकांना आलेली नाही मग त्यावर उपाय योजना करण्याचा प्रश्नच उरत नाही. परंतु यावर जीवनविद्येचा उत्कृष्ठ उपाय म्हणजे "विश्वप्रार्थना" हा होय. विश्वप्रार्थना म्हणता-म्हणता माणसाला सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य व सुयश प्राप्त होते.त्याचप्रमाणे प्रार्थनेने जशी जशी त्याची मनस्थिती सुधारत जाते, तशी तशी त्याची परिस्थितीसुध्दा आश्चर्यकारकरीत्या सुधारते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वप्रार्थनेमुळे धर्म-जात-वंश-पंथ अशा मानवनिर्मित भिंती ठिसूळ होऊन माणसा-माणसामधील संबंध सुध्दा सुधारतात. म्हणून सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना होय. विचारांत बदल घडवण्यासाठी व समाज परिवर्तनासाठी "विश्वप्रार्थना" हा रामबाण उपाय आहे. कारण विश्वप्रार्थना ही सुंदर विचारांनी भरलेली सोन्याची खाण आहे. इतकेच नव्हे तर परमेश्वर विश्वप्रार्थनेच्या स्वरूपात सगुण साकार आहे. ही विश्वप्रार्थना कोणीही म्हणावी त्यासाठी धर्म, जात, वंश, पंथ, भाषा वगैरे कसलेही बंधन नाही. त्याचप्रमाणे सोवळे-ओवळे, उपास-तपास, व्रत-वैकल्ये, तीर्थ-यात्रा वगैरे कसलेही कर्मकांड नाही. शिवाय हे करण्यासाठी एका पैचा खर्च नाही, कसलेही कष्ट नाहीत व आपला  कामाचा मौल्यवान वेळ खर्च करायचा नाही. १) दिवसभरात रिकामपणी, २) रात्री झोपण्यापूर्वी १०८ वेळा किंवा अर्धा तास, ३) झोप येईपर्यंत ही विश्वप्रार्थना प्रामाणिकपणे म्हटली की पुरे, अन्य काहीही कर्मकांड करण्याची गरज नाही. "रिकामपणी" या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणे इष्ट वाटते. रिकामपणी प्रार्थना म्हणणे याचा अर्थ मन रिकामे असेल तेव्हा प्रार्थना म्हणत रहाणे. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की, माणसाचे मन कधीच रिकामे नसते. म्हणूनच 'रिकामे मन हे सैतानाचे घर' अशी म्हण आहे. याचाच अर्थ असा की, ज्याला आपण रिकामे मन असे म्हणतो ते प्रत्यक्षात रिकामे नसतेच तर त्यात अनिष्ट विचार-विकार, अनिष्ट संकल्प-विकल्प, अनिष्ट कल्पना-भावना, अनिष्ट वासना-धारणा या स्वरूपात सैतान वास करीत असतो. म्हणून या सैतानाला बाहेर काढण्यासाठी त्या रिकाम्या मनात विश्वप्रार्थनास्वरूप परमेश्वराचा प्रवेश होणे आवश्यक आहे. उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करता येईल. आपल्यासमोर एक रिकामे भांडे आहे. प्रत्यक्षात हे भांडे रिकामे नाही, तर त्यात हवा भरलेली आहे. या भांड्यातील हवा बाहेर काढण्यासाठी त्या भांड्यात पाणी भरणे आवश्यक आहे. जितके पाणी आपण त्यात भरू तितक्या प्रमाणात त्या भांड्यातील हवा बाहेर पडेल. भांडे पाण्याने पूर्ण भरले की, भांड्यातील हवा पूर्णपणे बाहेर पडलेली असेल.  त्याचप्रमाणे आपल्या मनाच्या भांड्यात वर म्हटल्याप्रमाणे अनिष्ट गोष्टी भरलेल्या आहेत. या अनिष्ट गोष्टीच माणसाच्या जीवनात सर्व प्रकारची अनिष्ट परिस्थिती निर्माण करीत असतात. म्हणूनच ही अनिष्ट परिस्थिती बदलण्यासाठी आपले रिकामे मन विश्वप्रार्थनेने पूर्णपणे भरले पाहिजे. त्यासाठीच रिकामा वेळ वाया न जाऊ  देता, माणसाने प्रत्येक रिकामा क्षण विश्वप्रार्थनेने भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही विश्वप्रार्थना फळण्यासाठी थोडा धीर धरणे आवश्यक आहे. सहा महिन्यात विश्वप्रार्थना फळते असा बहुतेक  लोकांचा अनुभव आहे. बहिर्मनातून अंतर्मनात जाण्यासाठी, तेथे मूळ धरण्यासाठी व नंतर फळाला येण्यासाठी काही काळ जाणे जरूरीचे असते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. विलीयम जेम्स फादर ऑफ अमेरिकन सायकॉलॉजी या संदर्भात सांगतात-   
   
The power to move the world is in your subconscious mind, which is one with infinite intelligence and boundless wisdom. It is fed by hidden springs and is called the law of life. Whatever you impress on your subconscious mind the latter will move heaven and earth to bring it to pass. You must impress it with right ideas and constructive thoughts. 
       
    विश्वप्रार्थना म्हणणे वाटते तितके सोपे नाही. कोणीही उठावे व विश्वप्रार्थना म्हणावी इतके "विश्वप्रार्थना म्हणणे" सोपे नाही. त्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले पाहिजेत. परंतु विश्वप्रार्थना म्हणणाऱ्या माणसांची संगती मिळाली तर मात्र यश लवकर मिळते. आम्ही प्रकाशित केलेली विश्वप्रार्थनेची कॅसेट व मशीन सुध्दा याकामी  खुप उपयोगी पडते. श्रध्दा असो किंवा नसो विश्वप्रार्थनेचे फळ मिळणारच, कारण कर्माचे फळ कर्मातच असते. मनापासून विश्वप्रार्थना म्हटली तर फळ अल्पकाळात मिळते. येथे एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करतो. प्रचलित पध्दतीप्रमाणे जगातील प्रत्येक माणूस देवाजवळ स्वतःसाठी मागत असतो, मग इतरांचे काय होते किंवा काय होईल याचे सोयर सुतक त्याला नसते. परंतु येथे प्रकारच वेगळा आहे. विश्वप्रार्थना करताना आपण ईश्वराकडे जगातील सर्व लोकांसाठी मागतो. जेव्हा माणूस सर्वांचा "विचार" करतो, तेव्हा सर्व त्या माणसाचा कळत-नकळत विचार करतात. परिणामी सर्व लोकांकडून त्या माणसाला आश्चर्यकारकरीत्या विविध स्वरूपात अनुकूल प्रतिसाद मिळून त्याचे जीवनच सुखी, यशस्वी व समृध्द होते. शिवाय मी कडून सर्वांकडे वाटचाल करण्यात समाज परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडते, ते वेगळेच. आतापर्यंत अनेक लोकांना याची प्रचिती आली तशी तुम्हाला सुध्दा येईल या बद्दल खात्री बाळगा. कदाचित काही लोक वेडा-वाकडा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. अशी विश्वप्रार्थना म्हणून कुणाचे कधी भले झाले काय किंवा कुणाचे भले होण्याची शक्यता आहे काय? या वाकड्या प्रश्नाला सरळ उत्तर असे की, अनुभव घेतल्याशिवाय बोलणे हे शहाणपणाचे लक्षण नव्हे. वर मार्गदर्शन केल्याप्रमाणे विश्वप्रार्थना म्हणा व प्रत्यक्ष अनुभव घेऊन मगच बोला. विश्वप्रार्थना म्हणण्यात तुमचे काडीचेही नुकसान नाही. उलट तुमचा फायदाच होईल व अलभ्य लाभ होईल. आपले हित व कल्याण साधण्याचा हा सरळ सोपा राजमार्ग आहे. त्याचप्रमाणे ही विश्वप्रार्थना म्हणजे प्रत्यक्षात सुंदर असे सुदर्शन चक्र आहे. सुदर्शन म्हणजे सु-दर्शन. सुंदर विचारांचे दर्शन घेत रहाणे म्हणजे सु-दर्शन. भगवान श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्र दुर्जनांचा संहार करते व सज्जनांचे रक्षण करते. जीवनविद्येचे सुदर्शन चक्र वेगळे आहे. सुंदरविचारांचे सतत दर्शन घेता घेता, एक प्रकारचे सुदर्शन चक्र निर्माण होते व ते चक्र, विश्वप्रार्थना धारण करणाऱ्या माणसा भोवती फिरू लागते. सुंदरविचारांचे सुदर्शन चक्र एकदा का फिरू लागले ते चक्र त्या माणसाच्या जीवनातील अनिष्ट परिस्थिती व अनिष्ट गोष्टी नष्ट करते व दुर्जन माणसांना दूर ठेवते. त्याचबरोबर हे सुदर्शन चक्र अनुकूल व उत्तम परिस्थिती निर्माण करते. चांगल्या गोष्टी प्राप्त करून देते व सज्जन माणसांना आकर्षित करते. अशा रितीने विश्वप्रार्थनेचे हे सुदर्शन चक्र  आपल्याभोवती सतत फिरवत ठेवल्याने व त्याला योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांची साथ दिल्याने, माणसाला सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य, सुयश व समृध्दी प्राप्त होते. लक्षात ठेवा, विश्वप्रार्थनेच्या स्वरूपात प्रभु तुमच्या अंतःकरणात नित्य वास करील, तुम्हाला सतत साथ देईल व तुमच्या जीवनात सुरेख संगीत निर्माण करील.             
« Last Edit: January 30, 2008, 11:07:17 PM by dr.nutanpol » Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
SanyuktaDeshpande
New Contributor
*
Offline Offline

Posts: 14


« Reply #4 on: December 17, 2007, 12:29:12 PM »

Dr.Nutanji

You are doing a great job.
I have no words to thank you.
Awaiting for your more topics.

God bless u and all always.
Regards
Sanyukta
Report to moderator   Logged
Pages: [1]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!