Jeevanvidya Discussion Forums
May 20, 2012, 12:47:20 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: [1] 2   Go Down
  Print  
Author Topic: Je ka ranjale ganjale जे का रंजले गांजले  (Read 4838 times)
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« on: October 01, 2007, 12:51:02 PM »

नोबेल विजेते प्रोफेसर मुहमद युनुस स्वत: सागत आहेत - त्यांच्या ग्रामीण बँकेच्या यशस्वी प्रयोगाबद्दल
   बँकेच्या कामकाजाबाबत अनभिज्ञ असलेल्या एका माणसाने कुठल्यातरी अनाकलनीय पद्धतीने काहीतरी प्रयोग करावा व त्या प्रयोगाबद्दल काहीतरी ऐकायला मिळेल म्हणून रिझर्व बँकेचे गव्हर्नर, नाबार्डचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक तसेच रिझर्व बँकेची संचालक मंडळी व निरनिराळ्या बँकेतील तज्ज्ञ मंडळी आज येथे उपस्थित राहिली आहेत हा खरोखरच एक सन्मान आहे.  खरे म्हणजे हा प्रयोग करत असताना त्यावेळेस आम्ही नक्की काय करत होतो हे आमचे आम्हालाच कळत नव्हते.

   आम्ही जे काही केले त्यातील काही पैलूंवर प्रकाश टाकायची संधी मला मिळते आहे याचा मला खूपच आनंद होतोय.

   डॉ. थोरातांनी ग्रामीण बँकेबद्दल जे प्रास्ताविक केले ते खूपच प्रभावी होते.  त्यांनी वापरलेले शब्द हे खरे आहेत आणि त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्यात परिणामकारकता व ठामपणाही आहे.  परंतू हे मात्र नक्की की या कामातूनच आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर स्फूर्ती मिळत गेली.  आम्ही जी वाट चोखाळत होतो, ती वाट नक्की कशी आहे व ती आम्हाला कोठे पोहोचवणार आहे ह्याबाबत सुरवातीला आम्हाला काहीच कल्पना नव्हती.  असे नेहमी म्हटले जाते की दुष्काळामुळे मी इकडे ओढला गेलो. (डॉ. थोरातांनी आत्ताच यासाठी परिस्थिती असा शब्द वापरला.)  तेव्हां मी जवळच्याच एका विद्यापीठात अर्थशास्त्र विभागातील एक साधा शिक्षक होतो.  जवळच्याच एखाद्या गावात पडणारा दुष्काळ व त्याने घातलेले थैमान मी हतबल होऊन पाहात असे.  या दुष्काळाला तोंड द्यायला पाहिजे असे मला वाटत असले तरी माझ्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे मला या दुष्काळाला तोंड द्यायचे नव्हते. ( कारण त्या ज्ञानाच्या जोरावर मी दुष्काळाला सामोरा जाऊ शकणार नाही असे मला वाटे.)  मला असे वाटे की, मानवतेच्या भूमिकेतून या दुष्काळग्रस्त लोकांच्या बाजूने उभे राहून त्यांच्या दु:खात सहभागी होण्याची पात्रता माझ्यात नक्कीच आहे.

   अशारितीने या सगळ्याची सुरवात होऊन मी यात गुंतत गेलो.  पण मी नक्की काय केले पाहिजे हे मात्र मला कळत नव्हते.  प्रत्येक नवीन दिवस काहीतरी नवीन परिस्थिती घेऊन उगवायचा आणि त्यासाठी जे करायला पाहिजे असे मला वाटे ते मी करत असे.  सरतेशेवटी त्या गावातील लोकांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचा प्रयत्न मी सुरू केला.  कारण लोकांभोवती पडलेला सावकारी पाश व त्याचे ओंगळवाणे स्वरूप मला वेळोवेळी लक्षात येत होते.  पैसे कर्जाऊ देण्यातून निर्माण होणारे ओंगळवाणे प्रकार मला फार जवळून पाहायला मिळाले.  निव्वळ पुस्तके वाचून मला हे कळले नव्हते तर प्रत्यक्ष भरडल्या जाणाऱ्या माणसांची जिवंत कहाणी मी ऐकत होतो.  पाहात होतो.  याबाबत जास्त माहिती जमा करण्यासाठी, ज्यांनी सावकाराकडून कर्जाऊ पैसे घेतले आहेत अशा माणसांची नावे व त्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम याची एक यादी मी बनवली.  त्याबरोबर माझ्या लक्षात आले की, हा सर्व प्रकार ओंगळवाणा असला तरी त्यातून ह्या सर्वांना सोडवणे अगदी सोपे आहे व माझा हुरूप एकदम वाढला.  एकूण कर्जरक्कम इतकी क्षुल्लक  होती की मला एक जबरदस्त धक्काच बसला.  एकूण ४२ लोकांनी सगळे मिळून २७ डॉलरचे कर्ज घेतले होते.

   कर्जाची इतकी छोटीशी रक्कम या ४२ कुटुंबात एवढा मोठा उत्पात घडवून आणू शकेल यावर माझा विश्वासच बसेना.  कर्जाची रक्कम इतकी छोटी असल्यामुळे मला असे वाटू लागले की यांचा हा प्रश्न मी सोडवू शकेन.  फक्त मी माझ्या खिशातून २७ डॉलर दिले की काम होणार होते.  मी तसे केले व हा प्रश्न सुटला.  मला वाटले की अशा प्रकारचे प्रश्न असेच सोडवायचे असतात व पुढेही अशा छोट्या छोट्या गोष्टी करत राहणे आपल्याला जमू शकेल.  पण या एका घटनेमुळे या ४२ कुटुंबांमधे जो आनंदोत्सव पसरला त्यामुळे ही पद्धत मला इतक्या छोट्या पद्धतीने पुढे चालू ठेवणे शक्य झाले नाही.

   त्या लोकांना असे वाटू लागले की मी कोणी संत महंत आहे किंवा स्वर्गातून आलेला एखादा देवदूत किंवा असाच कोणीतरी आहे.  मी विचार करू लागलो की, या साऱ्या लोकांच्या जीवनात एवढा आनंद पसरवायला इतकी छोटी रक्कम कारणीभूत ठरत असेल तर हीच गोष्ट आपण मोठ्या प्रमाणावर का करू नये?  खरोखरच अगदी साधा विचार.  पण मी चोखाळत असलेल्या मार्गावर या विचारानेच मला आणखी पुढे ढकलले.  सावकारी पाशातून लोकांची मुक्तता करत राहाण्याचे कार्य पुढेही चालू ठेवावे असे वाटू लागले.  माझ्या मनात एक विचार सतत घोळू लागला की, जर या लोकांना मी बँकेकडून कर्ज मिळवून देऊ शकलो तर या सर्व प्रकारावर अगदी कायमस्वरूपाचा तोडगा निघू शकेल.  आता मला बँकेकडून या लोकांना कर्ज मिळवून देण्याव्यतिरिक्त वेगळे काहीच करावयाचे नव्हते.  म्हणून मी बँकेत गेलो व एक वेगळाच इतिहास लिहिला जाऊ लागला.  बँकेने चक्क नकार दिला.  पण या बाबतीत यश येण्याच्या दृष्टिकोनातून नवनवीन शक्यता अजमावत राहणे व सातत्याने त्याचा पाठपुरावा करण्याचे मी सोडले नाही व त्यामुळे मला शेवटी यावर उपाय सापडला.  बँकेच्या व्यवस्थापनातील सर्व उतरंडीतील सर्व ठिकाणी काही महिने निरनिराळे प्रयत्न करत राहिल्यानंतर मला असा एक उपाय सापडला जो साधा सोपा होता व तो मी अवलंबू शकत होतो.  मध्यंतरीच्या काळात मला बँकेच्या काही नियमांची माहिती झाली होती व त्यातील एका नियमाचा वापर करावयाचे मी ठरविले.  मी त्यांना म्हणालो, "या लोकांचा जामिनदार म्हणून तुम्ही मलाच का घेत नाही? त्यामुळे तुमचे सर्वच प्रश्न सुटतील.  मी या लोकांना जामीन राहातो. तुमच्या सर्व कागदपत्रांवर सह्या करतो आणि तुम्ही या लोकांना कर्ज द्या."  यावेळेस मी त्यांच्याच भाषेत बोलत होतो त्यामुळे त्यांना मला हाकलून देणे शक्यच नव्हते.  पण माझे म्हणणे मान्य होऊन त्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे व त्यानंतर त्यावर बँकेची कार्यवाही यात पुढचे २ महिने निघून गेले.  अशारितीने शेवटी माझे म्हणणे मान्य झाले.  मी कागदपत्रांवर सह्या करायला सुरवात केली व बँकेकडून कर्ज घेऊन ते मी या लोकांना देऊ लागलो.

   बँकेचे व्यवस्थापक मला म्हणाले, "या लोकांचे आता काम झाले असल्याने ही मंडळी तुम्हाला पुन्हा कधीच भेटण्याची शक्यता नाही.  तेव्हां तुम्ही तुमच्या पैशावर आता पाणी सोडलेले बरे!"  मी म्हणालो, "पुढे काय घडणार आहे याबाबत मला काहीच कल्पना नाही.  या पद्धतीने प्रश्न सोडवता येऊ शकेल किंवा नाही ह्याची शक्यता फक्त मी अजमावत आहे."
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #1 on: October 01, 2007, 01:00:34 PM »

या लोकांना कोणत्या प्रकारे मदत करावी जेणेकरून त्यांना कर्जफेड करणे जमू शकेल यावर मी विचार करायला लागलो.  बँका कर्जवसूलीसाठी नक्की काय करतात याबाबत मला काहीच माहित नव्हते.  मी बांगलादेशातील सहकारी बँकावर कडक टीका करणारा होतो.  मोठमोठाली कर्जे किंवा सरकारी पैसा संस्थाना देणे आणि काहीतरी भव्य-दिव्य उभे करण्याचा खटाटोप करणे हा प्रकार बांगलादेशातील सहकारी बँकाना अपयश येण्यास कारणीभूत आहे असे मी सांगत असे. आणि म्हणून मला असले भव्य-दिव्य प्रकार या नवीन प्रयोगात टाळायचे होते.  यासाठी मी कर्जफेड खूप सोपी केली पाहिजे असा विचार करत होतो.  या लोकांना एकरक्कमी कर्जफेड करायला सांगण्यापेक्षा कर्जफेडीचा हप्ताच असा ठेवायचा की, हप्ता भरणाऱ्याला तो अगदीच क्षुल्लक रक्कमेचा वाटेल व त्यामुळे त्याला तो भरणे अगदी सोपे जाईल असा काहीसा तो विचार होता.  बँकेचे दैनंदिन कामकाज कसे चालते हे ज्याला अजिबात माहित नाही असा माणूस जसा विचार करेल अगदी तस्सा विचार मी करायला लागलो.  मला असे वाटू लागले की या लोकांनी जर दररोज काही एक रक्कम कर्जफेडीचा हप्ता म्हणून दिली तर काय हरकत आहे?  प्रत्येक दिवशी ते अगदी छोटीशी रक्कम परत करतील व अशी रक्कम अगदीच छोटी असल्यामुळे त्यांना त्याचा त्रास तर होणार नाहीच उलट हप्ता भरणे आपल्याला सहज शक्य आहे असे वाटू लागेल.  या सगळ्या विचारातून मी दैनिक हप्ता वसूलीची पद्धत सुरू केली.  ही कल्पना खरोखरच फार चांगली होती.  फक्त कोणी पैसे दिले व कोणी दिले नाहीत हे कळायला काहीच मार्ग नव्हता.  कारण ह्या सर्व नोंदी करायला कुठलीच कार्यालयीन व्यवस्था अस्तित्वात नव्हती.

   त्या गावात रस्त्याच्या कोपऱ्यावरच एक दुकान होते.  मी त्या दुकानदाराला म्हटले की तू तुझ्या दुकानात लोकांचे हप्ते गोळा करण्यासाठी एक खोके ठेव म्हणजे ज्याला दैनंदिन हप्त्याचे पैसे भरावयाचे असतील तो दिवसभरात कधिही जेव्हा त्या खोक्याजवळून जाईल तेव्हा त्या खोक्यात पैसे टाकेल.  दुकानदाराने त्या प्रमाणे त्याच्या दुकानात खोके ठेवायला सुरवात केली पण त्याबरोबर त्यातूनच अडचणी निर्माण व्हायला लागल्या.  अगदी भांडणेसुध्दा व्हायला लागली.  कोणी म्हणावे, "मी पैसे दिले."  दुकानदाराने म्हणावे, "नाही नाही.  याने अजिबात पैसे दिलेले नाहीत."  असे सर्व प्रकारचे प्रश्नच प्रश्न उभे राहायला लागले.  त्यामुळे दैनिक कर्जहप्ता वसूली ही जरा गुंतागुंतीची आहे असे आम्ही म्हणायला लागलो.  खोक्याची पद्धत वापरून दररोज हप्तावसूली करणे शक्य नसेल तर आपण दररोज एका ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी एकत्र जमूया व तेव्हा सगळ्यांनी एकदमच पैसे जमा करावयाचे असे काहीसे आम्ही ठरवू लागलो.  पण त्यानंतर आमच्या लक्षात आले की, दररोज सर्वांनी एकदा एकत्र येणे हे जरा जास्तच गुंतागुंतीचे होते आहे.  सगळ्यांनाच प्रत्येक दिवशी ठराविक वेळेस एकत्र येणे फारच अवघड जाते आहे हे लक्षात आल्यावर त्यावर उपाय म्हणून आम्ही आठवड्यातून एकदा एकत्र येण्याचे ठरविले.  अशा रितीने साप्ताहिक सभेच्या पद्धतीला सुरवात झाली जी आपण आजही पाळत आहोत.  आठवड्यातून एकदा एकत्र येणे हे सहज शक्य असल्यामुळे साप्ताहिक सभेला जास्त जास्त लोक उपस्थित राहू लागले आणि साप्ताहिक सभेची व्याप्ती वाढता वाढता इतकी वाढली की त्यामुळे सभेचे नियंत्रण करणे अवघड बनून गोंधळ माजायला लागला.  त्यावर उपाय म्हणून आम्ही सगळ्याच बाबी दोन गटात विभागायचे ठरवले व एक सभा रविवारी व दुसरी सभा सोमवारी भरवावयाचे ठरविले.  अशा रितीने रविवारचा एक गट व सोमवारचा एक गट असे दोन गट तयार झाले व गट व्यवस्था अस्तित्वात येऊ लागली.  हळूहळू या गट पद्धतीला नीट स्वरूप प्राप्त होत जाऊन गटातील सभासदांच्या संख्येला महत्व आले व कालांतराने गटातील सभासदांची ही संख्या ५ ते १० च्या दरम्यान नक्की झाली.

   हे सगळे जसे घडत गेले, अगदी तसेच मी सांगत आहे.  प्रत्येक वेळेस जे करणे योग्य होईल असे मला वाटे ते मी करत असे.  जे घडलं त्यामागे एकादी विचारसरणी अथवा तत्वज्ञान वगैरे काहीही नव्हतं.  मला वाटायचं की अमुक एखादी गोष्ट केल्याने कोणाचा तरी फायदा होईल आणि म्हणून ती गोष्ट मी करत असे.  बँकेच्या दैनंदिन व्यवहाराबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे योग्य काय? व अयोग्य काय? याची मला कल्पनाही नव्हती.  आजही मला बँकेच्या दैनंदिन व्यवहारांबद्दल काहीही माहिती नाही; तरीही मी आज माझ्या पद्धतीवर आधारित एक बँक पद्धती बनवत आहे.  मागे वळून पाहाता मला असे वाटते की, त्यावेळेस मला बँकेच्या दैनंदिन व्यवहाराबद्दल काहीच माहिती नव्हती हे फार चांगले झाले.  अन्यथा बँकेच्या परंपरागत पद्धतींचा माझ्याकडून वापर केला जाऊन मीही इतरांसारखाच त्या जुन्या व मळलेल्या वाटेवरून चालत राहिलो असतो.  केवळ ही मळलेली वाट माहित नसल्यामुळेच मी माझी नवी वेगळी वाट चोखाळू शकलो.  अशा रितीने बँकेच्या परंपरागत पद्धतींबद्दलचे अज्ञान हे शाप न ठरता वरदानच ठरले.  इतकेच नव्हे तर ह्या अज्ञानाचाच मी फायदा उठवत राहिलो.  अशारितीने ही नवीन व्यवस्था जन्माला आली.  पण अस्तित्वात असलेल्या जुन्या बँकिंग व्यवस्थेबद्दल मी त्यावेळेस फारच कडक भाषेत टीका करत असे.  त्यामुळे या नवीन व्यवस्थेनुसार कार्य करायला मी सुरवात करणार, तोच एक दुसरीच समस्या उभी राहिली.  जेव्हां जेव्हां मला संधी मिळत असे तेव्हां तेव्हां मी एकूणच बँकिंग व्यवस्थेवर कडक भाषेत ताषेरे ओढत असे.  मी म्हणत असे की, बँकेच्या प्रचलीत कार्यपद्धतीमुळे गरीब लोकांना बँकेच्या सुविधा नाकारल्या जात आहेत आणि म्हणून लोकांशी व्यवहार करताना प्रचलित बँकिंग व्यवस्था ही अन्यायकारक व अहितकारक ठरत आहे.  तसेच कुठलेही ठोस कारण नसताना या बँकांनी गरीब लोकांना का बरे बँक सुविधांपासून लांब ठेवावे? व फक्त श्रीमंत लोकांनाच या सुविधांचा लाभ घेऊ द्यावा?  अर्थात कुठल्याच बँकेला ह्यावर गंभीर होऊन विचार करावासा वाटला नाही; कारण विचार न केल्याने त्यांचे काही बिघडणार नव्हते किंवा त्यांना तसा काही फरक पडणार नव्हता.  त्यांनी त्यांच्या विचारसरणीत बदल करावा, कमीतकमी त्यांना त्याबाबत विचार तरी करायला प्रवृत्त करावे यासाठी त्यांना एक चांगला जोरदार चिमटा काढला पाहिजे असे वाटून ज्याचा त्यांना चांगलाच त्रास होईल असा एक वेगळाच मुद्दा घेऊन मी त्यांचेवर टीका करावयास सुरवात केली.  मी म्हणालो, "या बँका फक्त गरीब लोकांनाच डावलत आहेत असे नसून ते महिलांना देखील नाकारत आहेत."  हा मुद्दा मात्र त्या बँकांना चांगलाच झोंबला असावा कारण त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी त्यांनी एकदाचे तोंड उघडले.  त्यानी सांगायला सुरवात केली की, ते महिलांना अगदी योग्य पद्धतीने वागवत असून पुरुषांप्रमाणे ते स्त्रियांना देखील कर्जे देतात.  आणि हा मुद्दा ठसावा म्हणून त्यांनी असेही सांगायला सुरवात केली की, निव्वळ त्यासाठीच त्यांनी "खास महिलांसाठी" म्हणून विशेष शाखा उघडल्या आहेत.  या त्यांच्या विधानांचा मला खूपच फायदा झाला.  मी त्यांना म्हणालो, "हो.  तुम्ही स्त्रियांसाठी म्हणून खास शाखा उघडल्या आहेत हे अगदी खरे आहे.  पण स्त्रियांना कर्जाऊ पैसे देता यावेत म्हणून तुम्ही त्या उघडलेल्या नाहीत तर ठेवीच्या रुपाने त्यांच्याकडून पैसे गोळा करता यावेत म्हणून त्या उघडल्या आहेत."  माझ्या ह्या मुद्यावर जास्त भर देत मी पुढे म्हणालो,"तुम्ही स्त्रियांना नुसते नाकारत नाही तर त्यांना कर्जेही देत नाही.  तुमच्या संपूर्ण कारभाराचा विचार करता, एकूण मंजूर कर्जप्रकरणांपैकी १ टक्का सुध्दा कर्जे स्त्रियांना दिल्याचे तुम्ही दाखवू शकणार नाही.  कमीत कमी १ टक्क्याएवढी कर्जे तुम्ही स्त्रियांना देता हे जर तुम्ही सिध्द करू शकलात तरच स्त्रियांना तुम्ही सापत्नभावाची वागणूक देता हा माझा आरोप मी मागे घ्यायला तयार आहे."  अर्थातच ते तसे काही सिध्द करू शकले नाहीत.  साधारणत: १९७०च्या मध्यावर मी व बँका यामधे हे वाक्‌युध्द चालू होते.  आज २००७ साल चालू आहे.  पण शक्यता अशी आहे की मी त्या वेळेस केलेला आरोप तितक्याच जोरदारपणे आजही मला बँकांवर करता येईल.  "तुमच्या एकूण कर्जदारांपैकी निदान १ टक्का कर्जदार ह्या स्त्रिया आहेत का?"  म्हणून जेव्हां आम्ही सुरवात केली तेव्हाच हे ठरवून टाकले होते की, या प्रकारचा आरोप दुरान्वयाने सुध्दा आपल्यावर कोणाला करता आला नाही पाहिजे.  यासाठीच माझ्या प्रयोगात एकूण कर्जदारांपैकी निम्मे कर्जदार ह्या स्त्रिया असतील हे कायमस्वरूपाचे धोरणच मी ठरविले.
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #2 on: October 01, 2007, 01:12:59 PM »

मला वाटले की हे सगळे अगदी सोपे असेल.  मी फक्त स्त्रियांना ग्रामिण बँकेत सामील व्हायचे आवाहन करावयाचे आणि त्या ग्रामिण बँकेत सामील झाल्या की त्यांना कर्जवाटप करायचे.  बस्स झाले माझे काम!  पण मी स्त्रियांबाबतचे अवलंबिलेले हे ५० टक्यांचे धोरण म्हणजे मीच माझ्यावर ओढवून घेतलेली सर्वात मोठी आपत्ती ठरली.  आम्ही जेव्हा ग्रामिण बँकेच्या संदर्भात स्त्रियांशी बोलायला जात असू तेव्हा त्या म्हणत,
"नको. नको. तुम्ही मला काही देऊ नका.  मला पैसे बाळगायची फार भीती वाटते हो."
"अगदी खर सांगते हो तुम्हाला, मला पैसे देऊ नका.  पैसे पाहून मला इतकी भीती वाटते की मी मरूनच जाईन."
"अहो मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पैशाला कधी हातसुध्दा लावलेला नाही हो.  खरचं, तुम्ही मला तो देऊ नका." 
तर कोणी म्हणे, "अहो ते पैसे तुम्ही माझ्या नवऱ्याला का देत नाही?  त्याला द्या ना.  कारण पैशाचे व्यवहार सगळे तोच तर बघतो.  मला काय त्यातले कळतयं.  मी तर कधीच पैशाचे व्यवहार केलेले नाहीत." 
कोणी म्हणे, "माझी आई मरणाच्या दारात असताना मला काय म्हणाली माहितेय?"  ती म्हणाली, "माझ्या लेकरा,  आयुष्यात कसलाही प्रसंग येऊ दे पण तू काही झाले तरी चुकुनसुध्दा कोणाकडून पैसे कर्जाऊ घेऊ नकोस."
ग्रामिण बँकेत पुरुष व स्त्रिया यांचा सहभाग ५०:५० असा असावा, यासाठी स्त्रियांचे प्रमाण ५० टक्के करण्याची धडपड मी जेव्हां करत होतो तेव्हा पैशासंबंधात स्त्रियांवर झालेले पूर्वीचे संस्कार हे असे होते.  त्या सर्व स्त्रिया एकमुखाने म्हणत होत्या की, आम्ही पैसे घेऊ इच्छीत नाही!  पण प्रयत्न करायचे सोडून कसे चालेल?  प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत असे वाटून मी त्या बाईला म्हणावे, "तुमची आई आज जर जिवंत असती आणि ग्रामिण बँक काय आहे हे तिला मी नीट समजावून सांगितले असते तर तिने नक्कीच तुम्हाला ग्रामिण बँकेत सहभागी होण्याचा सल्ला दिला असता.  कारण तुमची आई नक्कीच खूप शहाणी होती.  पैसे कधीही उसने घेऊ नकोस असे तिने तुम्हाला सांगितले तेव्हां त्यामागे तसेच कारण होते.  तिच्या काळात उसने पैसे फक्त सावकाराकडूनच मिळत असत आणि जेव्हा तुम्ही सावकाराकडून पैसे उसने घेता तेव्हाच तुम्ही संपून जाता.  त्यावेळेस थोडीच ग्रामीण बँक अस्तित्वात होती.  त्यामुळेच तिला सावकार व ग्रामीण बँक या दोन्हीतला फरक नक्कीच कळला असता व तिने नक्कीच तुम्हाला ग्रामीण बँकेत जायला सांगितले असते."  तर तात्पर्य सांगायचे म्हणजे जो मार्ग मिळेल त्या प्रत्येक मार्गाने आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि तब्बल ६ वर्षांनी आमच्या एकूण कर्जदारांपैकी ५० टक्के कर्जदार ह्या स्त्रिया होत्या.  आम्हाला खूप आनंद झाला.  आम्ही तो साजराही केला.  जे अजिबात शक्य नाही असे सर्वजण म्हणत होते ते शेवटी आम्ही शक्य करून दाखविले होते.  बाकीच्या इतर लोकांचे जाऊदे.  आमचे कर्मचारी देखील मला म्हणायचे, "हा ५० टक्के स्त्रियां असण्याचा विचार आपण सोडून देऊ.  तुम्ही काही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही.  जर त्या महिलांना पैसे नको असतील तर जाऊ दे ना.  तुम्ही कशासाठी त्यांच्या मागे लागताय?"  मी त्यांना म्हणायचो, "त्या जरी पैशाला नाही म्हणत असल्या तरी एका वेगळ्या अर्थाने ते खरे नाहीये.  त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा होईल असेच त्यांना आपण वागविलेले आहे.  आपला इतिहासच त्याला साक्ष आहे व तोच ह्या स्त्रियांच्या तोंडून तसे वदवतोय.  त्या स्त्रियांचे ते बोल नव्हेत.  या सर्वाला आपण त्यांच्याशी जे वागलो तेच कारणीभूत आहे आणि म्हणूनच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आपले कर्तव्य आहे.  कधीतरी एखाद्या दिवशी त्यांच्या भोवतीचे भीतीचे वरचे कडक आवरण व त्यानंतर त्याच्याही आत असलेले भीतीचे थरामागून थर काढायला लागणारच आहेत व हे काम दुसऱ्या कोणी नाही तर आपल्यालाच करायला लागणार आहे कारण हे भीतीचे थर आपणच तर त्यांच्याभोवती गुंडाळलेले आहेत.  मग असा एखादा दिवस उगवेल की जेव्हा आपण हे सगळे भीतीचे थर नाहीसे करू शकू व त्यावर ती स्त्री म्हणेल, 'ठीक आहे.  मी प्रयत्न करून बघते.'  आणि तेव्हाच आपल्याला यश मिळाले असे म्हणता येईल.  एखादी जरी तयार झाली तरी चालेल.  दोघीजर मिळाल्या तर फारच उत्तम.  त्यांना लागलीच सामावून घ्या कारण त्यामुळेच इतर जणींची भीड चेपेल.  आणि मग त्या एका मागोमाग एक येत जातील."  तर थोडक्यात सांगायचे म्हणजे हे सगळे घडायला तब्बल सहा वर्षे लागली!

   मग आम्हाला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवायला लागल्या.  स्त्रियांच्या मार्फत कुटुंबात येणारा पैसा त्या कुटुंबाची खूपच मोठ्या प्रमाणावर उन्नती करतो असे आढळून यायला लागले.  मात्र तेवढाच पैसा जर पुरुषांच्या मार्फत कुटुंबात आला तर तसे दिसून येत नसे.  जर आई कर्जदार असेल तर मुलांना त्याचा सर्वप्रथम फायदा होई.  महिला पैसा जास्त चांगल्यारितीने सांभाळू शकतात.  तसेच आगामी काळाचा अंदाज बांधणे त्यांना चांगले जमते.  त्या जरी स्पष्टपणे बोलू किंवा सांगू शकल्या नाहीत तरीही पुढे काय घडायची शक्यता आहे ह्याबाबत त्या विचार करताना किंवा त्याबाबत काहीतरी आडाखे बांधताना दिसतात.  याच्या उलट पुरुषांच्या हातात जर पैसे पडले तर त्यांना धीर धरणे फार अवघड जाते.  जे काय पैसे हातात असतील त्या पैशाचा ताबडतोब उपभोग घेण्याची त्यांची प्रवृत्ती असते.  कुटुंबातील सदस्यांच्या गरजांपेक्षा त्यांची स्वत:ची गरज ही त्यांना सर्वात महत्वाची वाटते त्यामुळे त्यांच्या गरजांवर ते सर्वप्रथम पैसे खर्च करण्याची शक्यता असते.  विशेषकरून मुलांकडे पुरुषांचे दुर्लक्ष होते.  मी म्हणालो, "असे जर असेल तर स्त्री-पुरुषांची संख्या नीम्मी-नीम्मी ठेवण्यात काय हशील आहे?"  म्हणून हे प्रमाण आम्ही बदलले.  स्त्रियांचे प्रमाण आम्ही ५० टक्केपेक्षा जास्त ठेवावयाचे ठरविले.  आम्ही स्त्रियांना जास्त महत्व देऊ लागलो.
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #3 on: October 01, 2007, 01:24:30 PM »

   दहा वर्षांनी म्हणजे १९८६ मधे, आमच्या कार्यालयाच्या बरोबर समोर असलेल्या बांगला देश इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट यांनी ग्रामीण बँकेला १० वर्ष पूरी झाल्याचे निमित्ताने बँकांचा एक परिसंवाद आयोजित करण्याचे ठरविले.  मला माहिती होते की मी मांडत असलेल्या विचारांवर हल्ला चढवायच्या निमित्ताने ते सर्व एकत्र आले आहेत.  मी म्हणालो, "ठीक आहे.  जर त्यांना चर्चाच करायची असेल तर आपणही जाऊ व चर्चा करू."  म्हणून मी त्या परिसंवादाला उपस्थित राहिलो.  ग्रामिण बँकेबद्दल बोलायला अनेक बँकेतील मान्यवर आले होते.  त्यांनी अनेक गोष्टींवरून आमच्यावर टीका केली.  त्यापैकी एका मुद्यावरून मात्र आमच्यावर वारंवार टीका होऊ लागली.  आमच्या बँकेच्या एकूण सभासदांपैकी ७० टक्के सभासद ह्या स्त्रिया असल्यामुळे आम्हाला प्रेक्षागृहातून असे सुचवले गेले की, "प्रो. युनुस, तुम्ही तुमच्या बँकेचे नाव बदलायला पाहिजे.  तुम्ही तुमच्या बँकेला ग्रामीण महिलांची बँक असे संबोधले पाहिजे.  कारण तुमच्या कर्जदारांमधे महिला बहुसंख्य आहेत."  गंमत म्हणजे प्रेक्षागृहातून आलेल्या ह्या सूचनेला अनेक मान्यवरांनी त्यांच्या भाषणात पाठिंबा दर्शविला.  उत्तराच्या भाषणात मी म्हणालो, "हो.  तुमची सूचना अमलांत आणायला मी पूर्णपणे तयार आहे.  ग्रामीण बँकेचे नाव बदलायला मलाही आवडेल.  पण त्याअगोदर तुम्हालापण काही पावले उचलायला लागतील.  तुम्हालाही तुमच्या बँकांची नावे बदलायला लागतील.  जसे, जनता पुरुषांची बँक, रुपाली पुरुषांची बँक, सोनाली पुरुषांची बँक वगैरे.  कारण तुमच्या बँकेत ९९.९९ टक्के पुरुष कर्जदार आहेत.  तुम्हीच ही कारणमीमांसा प्रथम मांडली आहे तेव्हां तुमच्या बँकांची नावे बदलायची पाळी प्रथम तुमची आहे.  तुम्ही जेव्हां तुमचे हे काम पूर्ण कराल तेव्हा मी पण तुमचे अनुकरण करीन."  अर्थातच ही सूचना घेऊन ते परत कधीही माझ्याकडे आले नाहीत.  हे मी सगळे सांगतोय त्यामागे माझा हे सांगायचा उद्देश आहे की, जेव्हां तुम्ही स्त्रियांच्या संदर्भात एखादी गोष्ट करायला सुरवात करता तेव्हां लोकांना असे वाटते की तुम्ही काहीतरी वेगळे करताय जे निश्चितपणे चांगले नसणारेय.  प्रत्येक जण तुमच्यावर पाळत ठेवून असतो.  मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो.  "अगदी आजही तुमच्या बँकेत इतक्या महिला का आहेत?"  अगदी खात्री बाळगा.  तुम्ही कुठेही गेलात ना, तरी कमीत कमी हा प्रश्न तरी लोकं तुम्हाला विचारणारच.  आणि मग मी त्यांना विचारतो, "इतके पुरुष काय म्हणून त्यांच्या बँकेत आहेत?  जणूकाही मी काहीतरी भयंकर किंवा काहीतरी चाकोरीबाहेरचे करतोय किंवा मी एखादी अगदी अयोग्य गोष्ट करतोय अशा प्रकारे तुम्ही मला हा प्रश्न का म्हणून विचारताय की, तुमच्या बँकेत इतक्या बायका का?"  थोडक्यात समाजाची सद्यपरिस्थितीतील मनोधारणा ही अशी आहे व अशा परिस्थितीत तुम्ही काम करत असता.  मुस्लिम समाजात तर स्त्रियांसाठी काम करणे फारच अवघड बनते.  कारण स्त्रियांनी घरकामा व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणासाठी घराचा उंबरठा ओलांडता कामा नये तसेच अशाप्रकारच्या कुठल्याही कामात स्त्रियांना सहभागी करून घेऊ नये असा विचार गावातील धार्मिक नेते येन केन प्रकारे लोकांच्या गळी उतरवत असतात.  स्त्रियांना पैसे बाळगायला देणे हे तर फारच चुकीचे आहे असे तर ते खूपच ठामपणे सांगतात.  या सगळ्या परिस्थितीतून आम्ही गेलो आहोत व त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलो आहोत.  ग्रामीण बँक ही संपूर्ण देशभर पसरलेली आहे.  बांगलादेशातील प्रत्येक खेड्यामधे ती अस्तित्वात आहे.  आणि आता आमचे असे प्रयत्न चालू आहेत की, बांगलादेशातील प्रत्येक गरिबाच्या घरी ती पोहोचेल.  आजमितीला बांगलादेशांतील ८० टक्के गरिबांच्या घरांत ती पोहोचलेली आहेच.  पण २०१० सालापर्यंत १०० टक्के गरीब कुटुंबे ही ग्रामीण बँकेला जोडली गेली पाहिजेत हे आमचे उद्दीष्ट आहे.

   ही १९८१ सालची गोष्ट आहे जेव्हा आम्हाला १०० टक्के गरिबांच्या मालकीची एक वेगळी बँक पाहिजे होती.  म्हणून गरीब लोकांसाठी, विशेषकरून गरीब महिलांसाठी स्वतंत्र बँक स्थापन करण्याची परवानगी मिळावी यासाठी आम्ही एक प्रस्ताव तयार करून तो सरकारला सादर केला होता.  सरकारला वाटले गरीब लोकांसाठी गरीब लोकांच्या मालकीची बँक स्थापन करणे हे काहीतरी धक्कादायक किंवा हास्यास्पद असे काहीसे आहे.  आमच्या प्रस्ताव कसा योग्य आहे हे सरकारला पटविण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध असलेली सर्वप्रकारची माहिती तसेच सर्वप्रकारची आकडेवारी आम्ही सरकारपुढे मांडत राहिलो.  सरकारामधील काही लोकांची सहानुभूती आम्हाला मिळाली हे आमचे सुदैव.  त्यामुळे दोन वर्षांनी का होईना शेवटी आमचा प्रस्ताव मान्य झाला.  बँकेचे जे कर्जदार असतात तेच बँकेचे १०० टक्के मालक असावेत असा आमचा मूळ प्रस्ताव होता.  पण जेव्हा याबाबतचा कायदा बनवला गेला तेव्हा मात्र बँकेत सरकारची मालकी ६० टक्के व कर्जदारांची मालकी ४० टक्के असणार होती.  आत्मियतेच्या मुद्यावरून मी १०० टक्के मालकीचा मुद्दा मांडला होता तो सरकारने लक्षातच न घेतल्यामुळे माझा अक्षरश: संताप झाला.  मी म्हणालो, "मी जी अविश्रांत धडपड केली ती काय सरकारी कायदा करून एक सरकारी बँक स्थापन करण्यासाठी?  मला सरकारी मालकीची बँक नको आहे.  मला गरीब कर्जदारांच्या १०० टक्के मालकीची बँक हवी आहे."  त्यामुळे माझ्या प्रस्तावाबद्दल सहानुभूती बाळगणारे अर्थमंत्री गोंधळात पडले.  ते म्हणाले, "तुम्हाला परवानगी पाहिजे होती.  ती मी तुम्हाला मिळवून दिली.  आणि आता तुम्हीच त्याबद्दल तक्रार करताय?"  मी म्हणालो, "पण मला जे पाहिजे होते ते हे नव्हे."  मला इतका राग आलेला होता की अर्थमंत्र्यांशी बोलायचे सुध्दा मी बंद केले.  शेवटी अर्थमंत्र्यांनी मला बोलावणे पाठवले.  ते म्हणाले, "मी तुमची अडचण समजू शकतो.  पण मला असे वाटते की आपण या पद्धतीने यातून मार्ग काढू शकू.  आपण पुढे जायला लागू या.  कायद्यानुसार पावले टाकायला आपण सुरवात तर करू या.  मी तुम्हाला वचन देतो की दोन वर्षात बँकेच्या मालकीचे प्रमाण मी बदलेन व ती कर्जदारांच्या मालकीची बँक बनेल.  मला सुध्दा मंत्रीमंडळाकडून त्यासाठी मान्यता मिळवायला लागेल व त्याला थोडा कालावधी लागेल.  मी आत्ताच जर सांगायला लागलो की ही बँक गरिबांच्या मालकीची असेल तर सरकारामधील कोणालाच ते पटणार नाही.  प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त चांगले मला इतकेच करता येण्यासारखे होते."  ह्या आश्वासनावर विसंबून मी तयार झालो.  पण ६० टक्के मालकी असलेली ही सरकारी बँक आहे; हे मी कदापिही विसरू शकत नव्हतो.  प्रत्यक्षात जेव्हां दोन वर्षे पूर्ण व्हायला आली, त्यावेळेसच काही राजकीय घडामोडींमुळे अर्थमंत्र्यांना राजिनामा द्यायला लागला व आम्ही चांगलेच खोड्यात आडकलो.  ज्याने आम्हाला दोन वर्षांचे वचन दिले होते तो माणूसच आता सरकारात नव्हता.  त्यामुळे हा प्रश्न परत अवघड होऊन बसला.  योगायोगाने तात्कालिन अर्थसचीव हेच अर्थमंत्री झाले.  म्हणून मी त्यांना भेटावयास गेलो आणि त्यांना अगोदरच्या मंत्र्यांनी दिलेल्या दोन वर्षाच्या आश्वासनाची आठवण करून दिली.  एवीतेवी त्यांना ते माहित होतेच म्हणा.  तर सांगायचे म्हणजे शेवटी हे मालकीचे प्रमाण बदलले.  त्याचाच परिणाम म्हणून आज बँकेची मालकी ९४ टक्के कर्जदारांकडे व ६ टक्के सरकारकडे आहे.

   आत्मियतेच्या दृष्टिकोनातून विचार करता, बँकेची मालकी हाच खरा कळीचा मुद्दा ठरला.  ह्या गरीब कर्जदारांना ह्याचा विलक्षण अभिमान वाटायला लागला की ही बँक आपली आहे.  आपल्याच कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे.  आपल्या आयुष्याशी निगडीत आहे.  आपले भवितव्य हिच्याशी बांधलेले आहे.  आणि म्हणून ही बँक आम्हाला सातत्याने चालू राहायला पाहिजे होती.  याच कारणासाठी आम्ही या कर्जदारांच्या मुलांकडे जास्त लक्ष पुरवायला लागलो.  या मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे यासाठी शैक्षणिक कर्जाची सुरवात झाली.  इतकेच नव्हे तर आम्ही निवृत्तीवेतन फंडालासुध्दा सुरवात केली.  खरे म्हणजे बाजारात व्यापारी बँकांनी काढलेली अशा प्रकारची निवृत्तीवेतन योजना अस्तित्वात होती.  पण त्यांच्या माहितीपत्रकात निवृत्ती वेतन फंड किंवा निवृत्ती वेतन ठेव योजना वगैरे जरी म्हटलेले असले तरी ती खूप महागडी आहे असे कारण सांगून या गरीब लोकांना त्या योजनेत सहभागी करून घ्यायला अशा बँका वाव देत नसत.  अशी योजना सुरू करण्यासाठी आम्ही सरकारकडून विशेष परवानगी काढली मात्र आणि याबाबतही चर्चेचे मोठे मोहोळ उठविण्यात आले.  लोकं असे बरेच काही म्हणायला लागले की, या ग्रामीण बँकेच्या कर्जदारांना पेन्शन फंड कशाशी खातात हे कळणार तरी आहे का?  आणि हे जर त्यांना कळलेच नाही तर ही गरीब लोकं काय म्हणून या पेन्शन फंडात पैसे गुंतवतील?  वगैरे वगैरे.  त्यामुळे ह्या लोकांना हे सर्व कसे समजेल याचाच विचार आम्ही करायला लागलो व त्यातूनच आम्हाला एक कल्पना सुचली.  आम्हाला असे वाटत होते की त्यांच्यातील काही जणांनातरी पेन्शन योजना म्हणजे काय हे नक्कीच कळेल व ते त्यात सहभागीही होतील.  पण प्रत्यक्षात मात्र आम्हाला अतिप्रचंड प्रतिसाद मिळाला.  ग्रामीण बँकेच्या प्रत्येक कर्जदाराला एक पेन्शन फंड खाते उघडायचे होते.  आज निवृत्तीवेतन फंड हा बँकेचा पैसे उभे करण्याचा एक नंबरचा स्रोत आहे कारण या फंडात आज प्रत्येक जण त्याच्या सुरक्षिततेसाठी किंवा स्थैर्यासाठी पैसे ठेवू इच्छितो.  निवृत्तीवेतन फंड म्हणजे काय हे लोकांना कळावे यासाठी आम्ही योजलेली कल्पना अगदी सोपी होती.  दर आठवड्याला तुम्ही काही एक रक्कम ठेवायची.  अशी रक्कम ५० टका (बांगलादेशच्या चलनाचे नाव) असो किंवा १०० टका अथवा २०० टका अशी काहीही असली तरी चालेल.  मात्र असे तुम्ही १० वर्षे करावयाचे.  १० वर्षांनी तुम्ही जेव्हा पैसे काढायला याल तेव्हा तुम्ही जी रक्कम ठेवलेली असेल बरोबर तेवढ्याच रक्कमेची भर बँक त्यात घालेल व तुम्हाला ते पैसे परत करेल.
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #4 on: October 01, 2007, 02:23:19 PM »

या गरीब कर्जदारांच्या भूमिकेतून विचार करता निवृत्तीवेतनाचा हा सगळाच व्यवहार म्हणजे कधी कोणाच्या स्वप्नात आले नाही किंवा कधी कोणाच्या स्वप्नात येऊ शकणार नाही अशाप्रकारची न भूतो न भविष्यति अशी  घटना होती.  ते सर्वच जण पैसे शिल्लक टाकायला धडपडू लागले कारण हे शिल्लक टाकलेले पैसे त्यांना ठराविक मुदतीनंतर दुप्पट होऊन मिळणार होते.  बँकेच्या परिभाषेत सांगावयाचे तर १२ टक्के व्याजदरावर ही योजना आधारलेली होती व आम्हाला १२ टक्के व्याज देणे परवडत होते.  पण त्यांना मात्र असे वाटत होते की, आम्ही त्यांच्यासाठी बरेच काहीतरी भव्य-दिव्य असे करतोय.  ही योजना बँकेच्या कर्जदारांपुरतीच मर्यादित होती.  पण आजूबाजूच्या गावातील गावकरी मंडळी आमच्याकडे येऊन मागणी करू लागले की, त्यांनाही एक खाते उघडायचे आहे व त्याचबरोबर एक निवृत्तीवेतन खातेही.  साहजिकच या गावकऱ्यांना परवानगी द्यायची किंवा नाही या मुद्यावरून आमच्यातच जोरदार उलट सुलट चर्चेच्या फैरी झडू लागल्या.  सरतेशेवटी अशी वेळ आली की, आम्ही इतरांना या योजनेत सहभागी करून घ्यायचे नाही असे ठरविले.  याचे कारण आमच्याकडे मुळातच भरपूर पैसा उपलब्ध होता व हा सर्व पैसा गरिबांना कर्ज देण्यासाठीच आम्हाला वापरावयाचा होता.  गरजेपेक्षा जास्त पैसा गोळा करायचा व तो आमच्या मूळ हेतू व्यतिरिक्त दुसरीकडेच कुठेतरी गुंतवायचा अशाप्रकारचा काही एक उद्योग आम्हाला करावयाचा नव्हता.  तो आमचा प्रांतही नव्हता.  यास्तव आम्ही या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावयाचे ठरविले की, आमचे मूळ उद्दिष्ट गरीब लोकांना कर्जे देणे हे असल्याने निव्वळ याच हेतूसाठी पैसा उभा करण्याचा एक मार्ग इतपतच निवृत्तीवेतन योजनेची व्याप्ती वाढवावयाची.  हे उदाहरण मी सांगतोय ते हे स्पष्ट करण्यासाठी की, आम्ही जेव्हा सरकारकडून निवृत्तीवेतन योजना सुरू करण्याची विशेष परवानगी मागितली तेव्हा त्याबाबत इतरांनी त्याबाबत घेतलेल्या आक्षेपानुसार काही घडले नाही.  आम्हाला लागलेली काळजी ही पैश्याचा तुडवड्यामुळे निर्माण झालेली नव्हती तर पैसा जास्त गोळा झाला तर काय होईल यातून निर्माण झाली होती. 

   आम्ही सर्वकाळ सातत्याने नवीन शाखा उघडत राहिलो कारण कुठलाही गरीब माणूस आम्हाला बँकसुविधांपासून वंचित राहायला नको होता.  २००५ साली आम्ही दिवसाला एक शाखा या गतीने शाखा उघडल्या.  अशारितीने त्या वर्षांत आम्ही चालू शाखांच्या संख्येत ३८० शाखांची भर घातली.  २००६ साली आम्ही दिवसाला सरासरी २ शाखा या गतीने त्यात भर घातली.  आज आमच्या २३०० पेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत.  आणि आम्ही हे कसे साध्य केले माहितेय?  अगदी सोपे आहे ते.  आम्ही शाखा व्यवस्थापक म्हणून एकाची निवड करायचो व जेथे ती शाखा उघडायची असेल तेथे त्याला पाठवून द्यावयाचो.  त्या जागी शाखा उघडण्याचे लायसेन्स त्याच्याकडे सूपूर्द केले की झाले आमचे काम.  म्हणजे ज्या जागी शाखा उघडायची तिथे तो त्याला मिळालेले लायसन्स फक्त घेऊन जायचा.  बाकी काहीही नाही.  आम्ही त्याला पैसे वगैरे काहीही द्यावयाचो नाही.  आम्ही त्याला फक्त सांगायचो की, "तू अमूक अमूक ठिकाणी शाखा सुरू कर.  तिथे लोकांकडून प्रथम ठेवी गोळा कर.  त्यातूनच लोकांना कर्जवाटप करायला सुरवात कर.  १२ महिन्याच्या आत ना नफा ना तोटा या पातळीवर  तुझी शाखा पोहोचली पाहिजे.  हेच तुझे काम आहे."  हे शाखा व्यवस्थापक तसे करून दाखवत असत!  तर सांगायचे म्हणजे एक माणूस रिकाम्या हाताने एके ठिकाणी जायचा.  तिथे शाखेची उभारणी करायचा.  तिथेच पैशाची उभारणी करायचा.  त्यातूनच तिथल्या गरीब लोकांना कर्जवाटप करायचा.  अशा रितीने तिथलाच पैसा तिथल्याच गरीब माणसांकडे जात राहायचा.  व या प्रकारे तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला जी काय बळकटी प्राप्त होईल ती करून द्यावयाचा.  हे सगळे जे काय आहे, त्याला म्हणतात ग्रामीण बँकेची शाखा.  अगदी अशीच प्रक्रिया प्रत्येक शाखेच्या बाबतीत असते.  काही शाखांना म्हणजे अंदाजे २० टक्के शाखांना ना नफा ना तोटा या पातळीवर यायला १२ महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो.  पण हा कालावधी दोन महिने किंवा ३ महिने जास्त इतकाच असतो.  काही वेळेस ५ महिनेपण जास्त लागू शकतात.  पण हे सर्व बऱ्याच इतर गोष्टींवरही अवलंबून असते.  पण तरीही असे म्हणता येते की ८० टक्के शाखा हे ध्येय १२ महिन्यांच्या आतच गाठतात.  पण हे ध्येय सर्व शाखा व्यवस्थापक आरामात गाठतात.  ते सुखी समाधानी असतात.  गावपातळीवर पैसा उपलब्ध असतो.  कोणाचीही तक्रार नसते.  पैसा आवश्यकतेपेक्षा जास्त गोळा झाला तर असा जास्तीचा पैसा मुख्य कार्यालयाकडे पाठवला जातो.  पण मुख्य कार्यालयाकडे पैसे पाठविल्यामुळे त्यांना उत्पन्नाचा आणखी एक स्रोत प्राप्त होतो कारण मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात येणाऱ्या पैशावर मुख्य कार्यालय १२ टक्के व्याज देते.

   या सर्व वाटचालीतील त्यानंतरची घटना म्हणजे शाखांचे मूल्यमापन करणे, त्यांच्या दर्जानुसार त्यांची वर्गवारी करणे.  पण कुठली शाखा चांगली आहे व कुठली एवढी चांगली नाही हे तुम्ही ठरविणार कसे?  येथे आम्ही तारांकित हॉटेलांच्या वर्गवारीमागे जी कल्पना आहे त्या कल्पनेचा अंगीकार केला.  ही पद्धत आम्ही सुरू केली कारण आम्हाला असे वाटले की ह्या प्रकारे त्यांना कुठल्याही शाखेचा दर्जा झटकन कळू शकेल.  जर एखाद्या शाखेची कर्जवसूली १०० टक्के असेल (१०० टक्के म्हणजे १०० टक्के.  ९९ टक्केही नाही किंवा ९९.९९ टक्केही नाही.) व हे प्रमाण संपूर्ण वर्षभर त्या शाखेने टिकवलेले असेल तर तुम्हाला एक तारा मिळणार.  हा असतो निळ्या रंगाचा तारा!  या तारांकित पद्धतीमधे प्रत्येक ताऱ्याला रंग असतो व प्रत्येक रंगाला अर्थ असतो.  त्यामुळे जेव्हा तुम्ही तो तारा पाहाता तेव्हां त्या ताऱ्याच्या रंगावरून तुम्हाला हा तारा का मिळालेला आहे हे त्याक्षणीच कळते.  आणि जर ती शाखा नफाही मिळवत असेल; खरे म्हणजे प्रत्येक शाखेने १२ महिन्यांच्या आत नफा मिळवायला सुरवात केली पाहिजे अशी अपेक्षा असते, तर तुम्हाला आणखी एक तारा मिळणार, तपकीरी रंगाचा तारा.  म्हणजे तुमच्याकडे निळ्या रंगाचा व तपकिरी रंगाचा असे दोन तारे असतील तर त्याचा अर्थ तुम्ही नफ्यातही आहात व तुमची वर्षभरातील कर्जवसुलीही १०० टक्के आहे असा होतो.  जर एखाद्या शाखेने जास्त ठेवी गोळया केल्या आणि त्या ठेवींच्या पैशांची त्यांना जरूरी नसल्यामुळे ते पैसे त्यांनी मुख्य कार्यालयाकडे पाठविले तर त्यांना आणखी एका रंगाचा तारा मिळतो.  साधारणत: एखादी चांगल्या प्रकारे चालणारी शाखा असेल तर त्या शाखेचे अंदाजे ४५०० ते ५००० कर्जदार असतात.  तर सांगायचे म्हणजे त्या शाखेने जोडलेले जे काही कर्जदार असतील त्या सर्व कर्जदारांच्या कुटुंबातील सर्व मुले जर शाळेत जात असतील, अगदी एखादे मूल सुध्दा याला अपवाद नसेल, तर त्या शाखेला आणखी एक तारा मिळतो.  आता त्या शाखेचे उद्दिष्ट असते गरीब लोकांना गरिबीतून वर आणणे.  ह्या लोकांना गरिबीतून वर यायला ज्याच्यामुळे मदत होईल अशा सर्व कारणांसाठी कर्ज द्यायला अशी शाखा नेहमीच प्रयत्नशील असते.  त्यानंतर अशी एक वेळ येते की, सर्वच्या सर्व ४५०० कर्जदार गरिबीतून बाहेर येतात.  बाहेरच्या हिशोबतपासणीसांकडून या लोकांची अगदी कसून तपासणी होते व त्या तपासणी अंती त्यांनी जर असे प्रमाणपत्र दिले की "हो.  सर्वच्या सर्व कर्जदारांनी दारिद्र्यरेषा ओलांडली आहे."  तर त्या शाखेने हेही उद्दिष्ट साध्य केल्याने ती शाखा अगदी आदर्श बनते.  त्या शाखेला आणखी एक तारा मिळतो.  आणखी एक रंग प्राप्त होतो.
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #5 on: October 01, 2007, 04:31:12 PM »

ज्या शाखेने या सर्व गोष्टी साध्य केल्या आहेत अशी पंचतारांकित शाखा डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा.  सर्व सामाजिक उद्दिष्ट्ये पूर्ण केलेली अशी शाखा तुम्हाला नक्कीच आवडेल.  मी तर त्यांना म्हणतो, "जर मी सरकारातील मुख्य माणूस असतो तर तुम्हाला मी राष्ट्रीय पारितोषिकच दिले असते.  जे साध्य करण्यासाठी सर्व देश धडपडतोय ते तुम्ही  साध्य करून दाखविले आहे आणि ते सुध्दा स्वबळावर!  विशेष म्हणजे यासाठी कोणावरही कोणताही बोजा पडलेला नाही.  लोकांना तुम्ही गरिबीतून वरती आणले आहे मात्र त्यासाठी कोणालाही दु:ख द्यायला लागलेले नाही, कोणाकडून काही हिरावून घ्यायला लागलेले नाही.  सर्वच सुखी आहेत."  एखाद्या कुटुंबाने दारिद्र्यरेषा ओलांडली आहे हे कसे ठरवायचे ह्यासाठी आम्ही एक पडताळणी यादी बनवली.  गरिबीतून बाहेर पडण्याच्या ह्या मार्गावर एखाद्या कुटुंबाने कितपत प्रगती साधली आहे हे आम्ही दरवर्षी या यादीच्या आधारे पडताळू शकतो.  जर तुम्ही पक्या छपराच्या घरात राहात असाल तर तुमच्या पडताळणी यादीत त्या बाबी पुढे बरोबरची खूण केली जाते कारण, तुम्ही ही बाब पूर्ण केली आहे.  जर तुमच्या घरामधे प्रसाधन गृहाची सोय असेल तर तुम्हाला आणखी एक गुण मिळतो कारण, ही गोष्टपण तुमच्याकडे आहे.  जर तुमच्याकडे शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय असेल व ती बाब तुमच्या पूर्णपणे अखत्यारीतील असेल तर आणखी एक गुण मिळतो.  जर तुमच्या बचत खात्यात ५००० टका शिल्लक असतील व बराच काळ तुम्ही त्याला हात लावलेला नसेल तर तुम्हाला आणखी एक गुण मिळतो कारण अचानक जर एखादी समस्या उदभवली तर ज्याचा तुम्हाला आधार  घेता येईल असे काहीतरी तुमच्याकडे आहे.  जर तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाकडे थंडीसाठी उबदार कपडे असतील तर आणखी एक बरोबरची खूण तुम्ही प्राप्त करता.  जर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक जण बिछान्यावर झोपत असेल आणि नाईलाज झाल्याने त्यांच्यावर उघड्या जमिनीवर झोपण्याची वेळ येत नसेल तर तुम्हाला आणखी एक गुण मिळतो.  तर अशा एकूण १० गोष्टी आहेत.  जर पाच गोष्टी साध्य झाल्या असतील तर त्याचा अर्थ पाच गोष्टी अजून करायच्या राहिल्या आहेत असा होतो.  मग आम्ही या पाच गोष्टींपैकी या वर्षी किंवा या महिन्यात तुम्हाला काय साधता येईल व त्यासाठी तुम्हाला कशी मदत करता येईल याचा विचार करतो व त्याप्रमाणे पावले उचलायला सुरवात करतो.  हेच तर आमचे काम आहे.  आणि जर एखाद्या कुटुंबाच्या बाबतीत यापैकी ९ गोष्टी पूर्ण झाल्या असतील व आता फक्त एकच गोष्ट साध्य करावयाची राहिली असेल तर संपूर्ण शाखा संघटित होऊन ती १० वी गोष्ट साध्य कशी होईल याच्या मागे लागते कारण ही जर एक बाब पूर्ण झाली तर एक कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर येणार असते.  आणि हे जर जमले तर आम्हाला असे वाटते की, आपण एका कुटुंबाला दारिद्र्याच्या खाईतून वरती ओढले.  हा सगळाच अनुभव अगदी मुळापासून चित्तथरारक असतो.  अनेक चांगल्या गोष्टींसाठी हे सर्वजण ह्या तारांकित पद्धतीकडे फारच गांभीर्याने पाहातात.  मी किंवा बँकेचे इतर कोणी वरिष्ठ अधिकारी जर त्यांच्या भागाला भेट देणार असू तर सर्व शाखा व्यवस्थापक किंवा त्या सभेला उपस्थित राहाणारे सर्व कर्मचारी त्यांना मिळालेले तारे लेउनच येतात.  आणि बैठक व्यवस्थाही ठरलेली असते.  पांच तारे असलेले सर्वात पुढे, त्यामागे चार तारे वाले, त्यानंतर तीन, दोन, एक व त्यानंतर बिगर तारे वाले बसतात.  त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची शेरेबाजी हमखास ऐकायला मिळते.  पुढे बसलेल्यांचा हेवा करत मागे बसलेला कोणीतरी,  पुढे बसलेल्या कोणाला तरी म्हणत असतो, "माझी एवढी काळजी करायची तुला काही एक कारण नाहीये.  बघच तू मी तिथे येतोय की नाही ते.  पुढच्या वर्षी जर मी तिथे आलो नाही ना तर बापाचे नाव लावणार नाही." वगैरे वगैरे.  हे सर्व तो म्हणत असतो कारण त्याला सर्वात पुढे बसायचे असते व ते सुध्दा पाच तारे लावून.  ती त्याच्या दृष्टीने खूपच अभिमानास्पद हवीहवीशी वाटणारी बाब असते.  त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक ताऱ्याबाबत खूप मोठा अभिमान ते बाळगत असतात. 

   दरवर्षी आम्ही स्पर्धा भरवतो.  आमच्या बँकेच्या कार्यक्षेत्राचे एकूण ३६ विभाग केलेले आहेत.  या ३६ विभागांचे त्यांच्या कामगिरीनुसार मूल्यमापन करणे हा ह्या स्पर्धेचा निकष असतो.  ही मूल्यमापन करण्याची पद्धत अतिशय तपशीलवार व योजनाबध्द असते.  तसेच हे मूल्यमापन प्रत्येक पातळीवर एकामागोमाग एक असे केले जाते.  या मूल्यमापनाच्या पद्धतीनुसार ज्या विभागाच्या खात्यात सर्वात जास्त गुण जमा होतात त्या विभागाला सुवर्ण चषक बहाल केला जातो.  हा सगळाच एक मोठा सोहोळा असतो.  आणि ज्यांना हा चषक मिळतो ना ते तो अशा पद्धतीने साजरा करतात की, पाहाणाऱ्याला वाटावे की, यांनी जणू फुटबॉलच्या मॅचमधेच हा मिळवला आहे.  संपूर्ण शहरात हा उत्सव खूप मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो.   ग्रामीण बँकेचा सुवर्णचषक मिळविल्याबद्दल सगळे गाव आनंदाने बेहोष होऊन नाचत असते.  ही स्पर्धा हे सगळेजण इतक्या गांभिर्याने घेतात की, अगदी थोडे गुण कमी पडल्यामुळे ज्यांना हा मिळत नाही व त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागते त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात असतात. 

   ह्या सगळ्या प्रकारांमुळे अशी काही वातावरण निर्मिती होते की ते जे काही करतात त्याचा त्यांना एकीकडे अभिमानही वाटत असतो तर दुसरीकडे ते त्याची मजाही लुटत असतात आणि त्यासाठी ते कठोर मेहनतही घेतात.  अगदी कठोर मेहेनत.  ग्रामीण बँकेचे काम हे सोपे काम नाही.  ते फारच परिश्रमाचे काम आहे.  जे काम आमच्याशिवाय कोणी करूच शकणार नाही असे काम आम्ही करत आहोत असे त्यांना वाटावे किंवा अशी भावना ते करत असलेल्या कामाशी जोडली जावी असा आमचा प्रयत्न असतो.  आज आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या २१,००० आहे, आणि ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांच्यापेक्षा ते फार काही वेगळे नाहीत.  ते सर्वजण निम्नस्तरीय मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहेत.  जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला वैद्यकीय शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मंजूर होते, तेव्हां तिचा वैद्यकीय कॉलेजमधला प्रवेश व त्यानंतर तिला शैक्षणिक कर्ज मंजूर करण्यासाठी केलेली धडपड वगैरे सगळेच एक एक करून आठवायला लागून त्या शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू जमा होतात.  हे अश्रू सांगत असतात, "केवढीशी होती हो ही.  अगदी आमच्या डोळ्यासमोर आता किती मोठी झालीय.  आम्ही तिला शाळेत जायला मदत केली.  आणि आज तर तिला शैक्षणिक कर्ज आम्ही मंजूर करू शकलोय.  आता ती वैद्यकीय कॉलेजमधे जाईल.  अहो, ती लवकरच डॉक्टर बनणार आहे.  नुसती डॉक्टर नव्हे तर या भागातली पहिली वहिली डॉक्टर.  या भागात या अगोदर डॉक्टर होताच कुढे?  असे काहीतरी करायची संधी या अगोदर इतर शाखांना मिळाली असेलही कदाचित.  पण आज आमची पाळी आहे हे सगळे करण्याची.  एका कुटुंबाला इथपर्यंत वर खेचण्याची.  त्यांच्यातील एक मुलीला तर आम्ही चक्क डॉक्टर बनायला मदत करणार आहोत.  हे सर्व करण्याची संधी कोण बरे गमवेल?  आम्ही तर नक्कीच नाही."  अशा प्रकारच्या विचारांनी त्यांची मनोवृत्तीच अशी बनून जाते की, ते जे काही करत असतात किंवा त्यांनी जे काही साध्य केलेले असते त्याबाबत ते अगदी सजग असतात.  हा त्यांचा सजगपणा लक्षात घेतला तरच, त्यांना नोबेल प्राइज मिळाल्याचे जेव्हां कळले तेव्हां त्यांची काय प्रतिक्रिया उमटली असेल याची कल्पना तुम्ही करू शकाल.  तुम्ही काहीतरी विशेष करून दाखविले आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष तर झालेले नाहीच उलट सर्व जग टाळ्या वाजवून तुमचे अभिनंदन करतेय.  तुम्ही केलेल्या कामाची दखल घेतली गेली आहे.
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #6 on: October 01, 2007, 04:39:22 PM »

पैसे कर्जाऊ द्यायचे, त्यावर व्याज लावायचे, मिळाली तर लोकप्रियता मिळवायची इतपतच छोटे ध्येय ठेवून या लोकांना मदत केली जात असलेली मी पाहात आलोय.  पण मला वाटते ही काही फार मोठी गोष्ट नाही.  बांगलादेशातील वर्तमानपत्रातून आमच्यावर टीका केली जाते की, आम्ही कर्जावर खूपच चढ्या भावाने व्याज आकारतो व अशा रितीने आम्ही गरीब लोकांना मारत आहोत.  अतिशय सामान्य व नेहमी केला जाणारा आरोप.  पण आमच्यावर हा आरोप करणाऱ्याला जर मी विचारले की, ग्रामीण बँकेत व्याजाचे दर काय आहेत? तर त्याला ते ठाऊक नसते!  तरीपण आम्ही जास्त व्याजदर लावतो किंवा असेच काहीतरी आरोप आमच्यावर करण्याचे ते थांबवत नाहीत.  तर अशा प्रकारच्या गोष्टी चालूच असतात.  दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी लोक पहिली पायरी मग दुसरी पायरी मग तिसरी पायरी या पद्धतीने हळूहळू आपली प्रगती साधत असतात.  आज आमच्या अंतर्गत पाहाणीनुसार ग्रामीण बँकेचे ५८ टक्के कर्जदार हे दारिद्र्यातून बाहेर पडले आहेत.  आणि प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक दिवशी जास्ती जास्ती कुटुंबे दारीद्र्यातून बाहेर पडत आहेत.

   आम्ही एक ध्येय निश्चित केले आहे.   इतके निश्चित की जणू काळ्या दगडावरची रेष.  या ध्येयानुसार २०१५ सालापर्यंत ग्रामीण बँकेशी जोडली गेलेली सर्व कुटुंबे दारिद्र्यातून बाहेर पडलेली असतील.  आणि तेव्हां उर्वरित देश किंवा उर्वरित जग गरिबी निम्याने कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची भाषा करत असेल.  आम्ही मात्र गरिबी पूर्णपणे नाहीशी केलेली असेल व सर्वांना दाखवून दिलेले असेल की, इतरांपेक्षा कितीतरी अगोदर हे आम्ही साध्य केलेले आहे.  यातूनच इतर सर्वांना स्फूर्ती मिळेल.  हे असे काहीतरी असेल की, गरिबी हटवणे हे अशक्य नसून ती हटवता येते याबाबत आम्ही लोकांच्यात विश्वास निर्माण केलेला असेल.  काहीतरी विशेष करून दाखवायची उर्मी, भावनाशीलता व अत्युच्च दर्जाची सृजनशीलता हा त्रिवेणी संगम प्रत्येक माणसामधे वसत असतो म्हणून दारिद्र्य निर्मूलन हे शक्य आहे.  ते साध्य करता येऊ शकते.  आपल्या प्रत्येकामधे ही अतिप्रचंड सृजनशीलता लपलेली आहे.  आपल्यातील काही जण या सृजनशीलतेचा थोडाफार वापर करण्यात सुदैवी ठरतात.  तर काही जणांना ही संधीच मिळत नाही कारण आपण ती त्याला मिळवून देत नाही.  समाज त्यांना संधी नाकारतो.  समाजाचा एक घटक म्हणून आपल्या प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की, जर एखादा त्याच्यात दडलेल्या सृजनशीलतेला वापर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आपण तशी संधी मिळवून दिली पाहिजे.

   सामाजिक कार्याबद्दल आता मला शेवटचा मुद्दा मांडायचा आहे.  छोट्या प्रमाणावर पतपुरवठा करताना नफा मिळवणे किंवा हा नफा वाढविण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे प्रयत्न करणे ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत.  त्याच्या पेक्षा मोठा आवाका ठेवून काही जास्तीच्या गोष्टी लोकांच्या भल्यासाठी आपल्याला करता येऊ शकतात.  काहीतरी फायदा व्हावा किंवा कुठलातरी वैयक्तिक स्वार्थ साधता यावा हा हेतू न ठेवता आपण आपल्यापरिने एक सामाजिक उद्दिष्ट निश्चित करू शकतो.  संपूर्णपणे त्या ध्येयासाठी वाहून घेऊ शकतो.  आणि हे सामाजिक ध्येय आपले आपल्यालाच ठरवता येऊ शकते.  लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढणे अशा प्रकारचे कुठलेही सामाजिक उद्दिष्ट ठेवून आपण लोकांना मदत करू शकतो.

   रस्त्यातून भीक मागत हिंडणाऱ्यांना प्रतिष्ठेने जीवन जगता यावे यासाठी त्यांना एखादी संधी मिळवून देणे व अशारितीने रस्त्यांमधून आढळणारे भिकारी नाहिसे करणे हे अशाप्रकारचे दुसरे ध्येय असू शकेल.  आम्ही असे एक सामाजिक उद्दिष्ट निश्चित करून भिकाऱ्यांना कर्ज द्यायला सुरवात करावयाचे ठरविले.  हा प्रयत्न आमच्यासाठी खूपच मनोवेधक अनुभव ठरला.  वस्तुस्थिती अशी आहे की, आज आमच्या या प्रयोगात ८५,००० भिकारी सहभागी झाले आहेत.  आम्ही त्यांना इतकेच सांगितले की, "तुम्ही घराघरातून भीक मागत हिंडत असता.  तर असे हिंडत असताना सहज विकल्या जाऊ शकतील व लोकांनाही विकत घ्यायला आवडेल अशा वस्तू उदाहरणार्थ लहान मुलांची खेळणी, गोळ्या बिस्कीटे अशा सारख्या वस्तू तुम्ही तुमच्या जवळ का ठेवत नाही?  ह्या वस्तू तुम्हाला सहज विकता येतील.  जर तुम्हाला असे काही करावयाचे असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला कर्ज द्यायला तयार आहोत.  त्यावर आम्ही व्याजसुध्दा घेणार नाही.  दोन्ही गोष्टी करून बघा आणि तुम्हीच ठरवा कुठली गोष्ट तुमच्या फायद्याची आहे ते."   भीक मागू नका असे खरेतर आम्ही कोणालाच सांगितले नाही.  तरीही कित्येकजण आता वस्तूच विकतात. भीक मागायचे त्यांनी पूर्णपणे बंद केले  आहे.  तर कित्येकांना असे आढळून आले की, काही भागात भीक मागणे फायद्याचे असते तर काही भागात वस्तू विकणे फायद्याचे असते.  शुक्रवार तर भीक मागण्यातच जास्त फायदा होतो.  त्यामुळे आता आमच्या या प्रयोगात दोन गट झाले आहेत.  वस्तू विकणाऱ्यांचा एक गट व भीक मागणाऱ्यांचा दुसरा गट.

   आपल्यातील प्रत्येकालाच असे वाटते की आव्हानांना तोंड देण्याच्या प्रयत्नांतूनच माणसाची प्रगती झपाट्याने होते.  मात्र ही आव्हाने आपल्याला नीट समजावून घेता आली पाहिजेत.  तरच त्यांच्यावर मात करण्यासाठी आपण योग्य पावले उचलू शकू.  आणि या प्रक्रियेतूनच आपण असा एक समाज, असा एक समूह तयार करू शकू, की जिथे औषधालासुध्दा गरिबी सापडणार नाही.  कोणालाही गरिबीपासून त्रास होता कामा नये.  कारण कोणालाच ती नको आहे.  माणसाच्या उन्नतीसाठी गरिबी असायलाच हवी अशी अट कोणीही घातलेली नाही तर गरिबी फक्त आपल्यावर लादलेली आहे.  गरिबी ही कृत्रिमपणे तयार करून आपल्यावर लादलेली असते आणि म्हणूनच ती आपण फेकून देऊ शकतो.  गरिबी, ही फक्त गरिबीच्या खुणा जतन करणाऱ्या संग्रहालयात असायला हवी.  अशा प्रकारची संग्रहालये संपूर्ण जगभर बांधण्यासाठी आपण तयारी करायला लागूया.  म्हणजे जो कुणी या संग्रहालयाला भेट देईल तो त्या गरिबीकडे पाहून म्हणेल, "ओहो!  गरिबी गरिबी म्हणतात ती अशी असते होय!"
स्वैर अनुवाद : शाम भागवत, पुणे.
(आधार : डॉ. मुहमद युनुस, २००६ सालचे शांततेचे नोबेल प्राईज विजेते आणि संस्थापक, ग्रामीण बँक, बांगलादेश यांनी २ फेब्रुवारी २००७ रोजी नाबार्डच्या मुख्यालयात केलेले भाषण - नाबार्ड न्यूजलेटर व्हॉल्यूम १७ क्रमांक १०)
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #7 on: October 01, 2007, 05:10:30 PM »

jpg attachment continued
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #8 on: October 01, 2007, 05:18:57 PM »

jpg attachment continued
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #9 on: October 01, 2007, 06:46:17 PM »

jpg attachment continued
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #10 on: October 01, 2007, 06:48:00 PM »

jpg attachment continued
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #11 on: October 01, 2007, 06:52:33 PM »

jpg attachment continued
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #12 on: October 01, 2007, 06:54:48 PM »

jpg attachment continued
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #13 on: October 01, 2007, 06:56:37 PM »

jpg attachment continued
Report to moderator   Logged
gargi
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 85


« Reply #14 on: October 03, 2007, 12:22:17 AM »

Thanks to Mr Bhagwat and Varsha for giving me more motivation in applying JVM knowledge in my work. Mr Bhagwat your translation of Mr Yunus's speech proves that everything is possible if we can get the collective subconscious to accept an idea for the betterment of humanity. I always feel that sadguru is guiding us when I read your posts to make the world a happier place. Please share ideas regarding working with children/ people who are mentally and physically handicapped-if we constatnly send thoughts of healing,goodwill and peace to them and their families along with getting these children to hear the vishwaprarthana during our treatment sessions it can make a difference. More importantly if we can get the collective subconscious as a whole- their families, teachers and all those asssociated to them to believe that a healing is possible, then they can be healed completely. Any more suggestions on how to make this happen.
Report to moderator   Logged
Pages: [1] 2   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!