But I am always scared that this will increase my ahankar.
सर्वांना नमस्कार,
हे वाक्य फारच महत्वाचे आहे.
आपला अशुध्द अहंकार कमी करण्यासाठी आपण साधना करत असतो ह्याचे बऱ्याच वेळेस विस्मरण होते. किंबहुना आपली साधना योग्य रितीने चालली आहे किंवा नाही याचा पडताळा घेण्यासाठी आपला अहंकार कमी होतो आहे का ? या एकमेव निकषाच्या आधारे आपणच आपल्याला तपासून घेणे हा एक सोपा मार्ग आहे. तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात कारण आपला अहंकार वाढणार तर नाहीना अशी भिती तुम्हाला वाटते. हा सावधपणा फारच थोड्यांना आपोआप प्राप्त होत असतो.
अहंकार कमी करणे अथवा वाढवू न देणे ही जरी अवघड बाब असली तर अशक्य कोटीतील नक्कीच नाही. मात्र कृतज्ञता वाढवून अहंकारावर ताबा ठेवता येउ शकतो व ही प्रक्रिया खूपच सोपी सुलभ व आनंददायी आहे.
१) अनेकांकडे कलागुण नसतात मात्र परमेश्वराने ते तुम्हाला देऊन तुमच्यावर उपकार केले आहेत हा एकमेव विचार तुम्हाला कृतज्ञता वाढवायला उपयोगी पडेल. इतकेच नव्हे देवाने दिलेली ह्या देणगीचा मी नीट वापर केला पाहिजे व या देणगीची मी नीट जोपासना केली पाहीजे हे जबाबदारीचे भान यातूनच निर्माण होऊन तुमच्यात असलेल्या कलागुणांचा आणखी चांगला उत्कर्ष तुम्ही साधू शकाल.
२) जगातील अनेक जणांकडे अनेक कलागुण असतात पण प्रत्येकाला वाव मिळतोच असे नाही. तुम्हाला त्या परमेश्वराने तुमच्या गुणांचा वापर करण्याची संधीसुध्दा मिळवून दिली आहे हे त्याचे कितीतरी मोठे उपकार आहेत असे जर तुम्हाला वाटू लागले तर तुमचे कलागुण सादर करण्याची संधी म्हणजे म्हणजे परमेश्वराप्रती कृतज्ञता वाढविण्याची संधी आहे असे वाटून तुम्ही तुम्हाला मिळालेल्या त्या संधीचे सोने करू शकाल.
३) यश व स्तुती पचवणे ही फारच अवघड बाब असते. मात्र लोक आपली जी स्तुती करत आहेत त्यामधे वरील दोन मुद्यांचाही वाटा आहे हे त्यावेळेस स्मरणात ठेवावयाचा प्रयत्न करू शकलात तर तुम्ही ती स्तुती सहज झेलू शकाल. त्यातून तुमची नम्रता ठासळू शकणार नाही. आंब्याचे झाडावरील आंबे जसजसे मोठे होऊन पिकायला लागतात व त्याप्रमाणात ते झाड आणखी आणखी खाली झुकू लागते त्याप्रमाणे वाढण्याऱ्या स्तुतीच्या प्रमाणात तुम्ही तुमची नम्रता वाढवू शकाल.
४) आनंद वाटा व आनंद लुटा हे जीवनविद्येचे तत्वज्ञान आहे. लोकांना आनंद वाटण्याचे केवढे मोठे साधन परमेश्वराने तुम्हाला बहाल केले आहे हे जर तुम्ही लक्षात घेतले व आनंद वाटण्यासाठीच मी या देणगीचा उपयोग करत आहे हा विचार तुम्हाला अहंकारापासून नक्कीच लांब ठेवेल असे वाटते. इतकेच नव्हे तर तुमचे जीवन दिवसेंदिवस आणखीन आनंदी होत चालेले आहे असा अनुभवही तुम्हाला वारंवार येईल.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.