सर्वांना नमस्कार,
1. साधना करायचीच तर सोपेपणाचा सोस का असावा?
एखादा विषय समजावून सांगण्यासाठी आपण एखादे उदाहरण देतो. त्यामुळे विषय समजावून सांगणे तसेच विषय समजावून घेणे या दोन्ही गोष्टी सोप्या जातात. पण सोपेपणाचा सोस नको म्हणून कुठल्याही परिस्थितीत सोदाहरण स्पष्टीकरण द्यावयाचे नाही हे मला पटत नाही.
एखाद्या रासायनिक प्रक्रियेत एखादा (उदासीन) पदार्थ कोणत्याही प्रकारचा भाग घेत नाही. इतकेच नव्हे तर ती रासायनिक क्रिया पार पडल्यावरही त्या पदार्थाच्या कोणत्याही गुणधर्मात फरक पडत नाही. तरीही निव्वळ त्या पदार्थाच्या अस्तित्वामुळे ती रासायनिक प्रक्रिया खूप सोपी होते हे आपण पाहातो. पण सोपेपणाचा सोस नको म्हणून या पदार्थाचा वापर टाळला पाहिजे हे ही मला पटत नाही. सोपेपणाचा हव्यास असा शिक्का बसू नये म्हणून अध्यात्मात नेहमी अवघड मार्गानेच गेले पाहिजे हे विचार समजून घेणे मला अजिबात सोपे वाटत नसल्यामुळे त्या विचाराचा नाद मी सोडला आहे.
मला वाटते अंगीकृत कार्य करणे सोपे जावे असे वाटणे ही नैसर्गिक प्रेरणा आहे. विज्ञानाची प्रगती होण्याची जी अनेक कारणे आहेत त्यामधे मानवाला असलेला सोपेपणाचा हव्यास हे ही एक महत्वाचे कारण आहे असे मी मानतो. निसर्ग देखील कमीत कमी जागेत, कमीत कमी उर्जेत जास्तीत जास्त कार्य ह्या पध्दतीने म्हणजे सोपेपणाचीच कास धरतो.
मात्र एक गोष्ट मात्र इथे स्पष्ट केली पाहिजे की, आपण निश्चीत केलेले धेय्य जर विश्वनियमांना धरुन नसेल तर मात्र कार्यसिध्दीसाठी अंगिकारलेला हा सोपेपणाचा हव्यास अयोग्य असतो असे निश्चीतपणे म्हणता येईल. उदा. दुसऱ्यांना कितिही त्रास झाला तरी चालेल, राष्ट्र खड्यात गेले तरी चालेल पण मला खूप पैसा मिळवायचा आहे असे धेय्य असलेला माणूस कमीत कमी श्रमात, जास्तीत जास्त पैसा मिळविण्याचा (भ्रष्टाचार) प्रयत्न करतो. येथे मात्र त्याचे धेय्य विश्वनियमांना धरून नसल्याने त्या माणसाचा सोपेपणाचा हव्यास अयोग्यच समजला पाहिजे.
अध्यात्मशास्त्रातील पहिली पायरी म्हणून, नामस्मरण करणे व त्यायोगे विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला साधणे हे जर माझे धेय्य असेल व अध्यात्मशास्त्रातल्या निरनिराळ्या सिध्दांतांवर (पुनर्जन्मा सकट) श्रध्दा ठेवल्याने हे धेय्य साधणे सोपे जाते आहे असा जर मला अनुभव येत असेल तर मी माझा मार्ग का बरे सोडावा? कोणीतरी "सोपेपणाचा हव्यास" हा शिक्का आपल्यावर मारेल म्हणून मी तरी मुद्दामहून माझा सोपा मार्ग सोडून अवघड मार्ग स्विकारणार नाही.
2. पुनर्जन्म ही संकल्पना मान्य केली असता जो आकृतीबंध तयार होतो त्यातून पुनर्जन्म हा गोंद बाजूला काढता येतो का?
3. पुनर्जन्म हा गोंद बाजूला काढता येत असेल तर तसे केल्यास तो आकृतीबंध एकसंध राहतो का?
मी वर मांडलेले धेय्य जेव्हा साध्य झाले आहे असे मला वाटेल तेव्हा त्यापुढचे धेय्य मी नक्कीच निवडणार आहे. त्यावेळेस तुम्ही मांडलेल्या मुद्दा क्रमांक २ व ३ वर संशोधन करावयाचे किंवा नाही हा पर्याय माझ्यापुढे असू शकतो इतकेच याबाबत मी म्हणू शकतो. जर मी हा पर्याय वापरला तर मात्र मी कदाचित तुम्हाला याबाबतीत काही कळवू शकेन. असो.
आपला साधनेचा मार्ग घातक, आत्मतुष्टीचा, अंधश्रद्धेला पोषक, व उधारीची रक्कम ही मिळकत समजण्यासारखे आहे हे खेदाने नमूद करावे लागेल. त्याखेरीज तो आकृतीबंध हा कृत्रिम, तकलादू व पुढील वाटचालीसाठीचा फसवा सोबती आहे असे ही म्हणावे लागेल.
पुनर्जन्म असतो किंवा नसतो ह्यावर संशोधन करणे हे जर माझे धेय्य असते तर मात्र पुनर्जन्म ह्या संकल्पनेवर श्रध्दा ठेवून हे संशोधन करणे गैर ठरले असते व तुम्ही वर्तवलेले भविष्य खरे ठरण्याचा संभव होता असे जास्तीत जास्त म्हणता येऊ शकेल.
सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.