' Tumhe sukhane jaga Etrana sukhane jagu dya '. In day to day life it is possible that easy sadguru express it.
सर्वांना नमस्कार,
मला वाटते वरील प्रश्नाचा रोख वेगळा असावा. या प्रश्नामधील "सहज" या शब्दाला सर्वात जास्त महत्त्व आहे असे वाटते. म्हणून मूळ प्रश्न असा असावा. सद्गुरू अगदी सहजपणे सांगतात की, तुम्ही सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू द्या. पण प्रत्यक्ष जीवनात इतक्या सहजपणे हे शक्य होऊ शकेल का? यातून असे सूचित होते आहे असे वाटते की, सद्गुरू जे सांगत आहेत त्या बद्दल काही एक शंका नसून असे सहजपणे घडणे आजच्या काळात शक्य आहे का याबाबतची शंका व्यक्त केली गेलेली असावी. यास्तव प्रश्नातील "सहज" या शब्दाच्या अनुषंगाने उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र माझा हा तर्क बरोबर आहे किंवा नाही हे प्रश्नकर्ताच सांगू शकेल. असो.
मला वाटते वरील शंका येणे रास्त आहे. आपण जेव्हा एखादे महत्त्वाचे नवीन कार्य सुरू करतो तसेच त्या कार्याबद्दल आपल्याला विशेष अनुभव नसतो तेव्हा अगदी अशीच शंका आपल्या मनात येत असते. सारखे असे वाटू लागते की, हे आपल्याला जमेल का? खरेच आपल्याकडून हे होऊ शकेल का? याचा परिणाम असा होतो की ते कार्य सुरू करायलाच आपण बिचकतो. अशा वेळेस कोणीतरी आपला हितकर्ता आपल्याला प्रोत्साहन देतो व ते कार्य आपल्याला जमू शकेल असा विश्वास आपल्यात निर्माण करतो व आपण ते कार्य सुरू करून ते तडीसही नेतो. मला वाटते ही हितकर्त्याची भूमिका आपल्या लहानपणी नेहमी आई-वडील अथवा थोरला भाऊ-बहीण पार पाडत असतात. आपल्या हितकर्त्यावरील श्रध्दा आपल्याला बळ देत असते हे जरी त्यावेळेस आपल्या लक्षात येत नसले तरी त्या जोरावरच आपण आपला कार्यभाग साधत असतो.
म्हणूनच आजच्या काळात श्रध्देशिवाय सद्गुरूंच्या वरील वाक्याची प्रचिती येणे हे अत्यंत अवघड आहे हे मला मान्य करायला लागते. पण त्याचबरोबर सद्गुरू वाक्यावर जर श्रध्दा ठेवता आली तर मात्र ही प्रचिती सहजपणे कशी येऊ शकते तो अनुभवही सहजपणे प्राप्त होऊ शकतो. थोडक्यात संतवचनावर श्रध्दा ठेवता येणे हे एकमेव उत्तर वरील प्रश्नावर आहे असे म्हणता येते. येथे एक गोष्ट मात्र स्पष्ट केली पाहिजे की, जो आपला खरा हितकर्ता नाही त्याला आपला हितकर्ता मानण्याची चूक झाली तर मात्र विपरीत घडण्याची शक्यता असते हे ही नाकारता येत नाही.
पण सद्गुरू जे सांगतात त्यावर श्रध्दा कशी ठेवायची असा नवीनच प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतो. कारण श्रध्दा बाजारात विकत मिळत नाही. अंधश्रध्दा, डोळस श्रध्दा वगैरे श्रध्देचे पोटप्रकारही कानावर आलेले असतात. आपल्या आजूबाजूच्या काही मंडळींनी पण त्यांचा विशेष अभ्यास नसताना सद्गुरूंच्या वाक्याबाबत नकारात्मक मतप्रदर्शन करून आपली शंका बलवत्तर केलेली असते. मग करायचे तरी काय असा प्रश्न पडतो.
यावर आपणच काही प्रश्न आपल्याला विचारायचे व आपला मार्ग निश्चित करायचा.
१. संतांचे एक वैशिष्ट्य असते. ते नेहमी आधी केले मग सांगितले हे तत्त्व पाळत असतात. असे जर असेल तर ते जे सांगतात त्याचा त्यांनी नक्कीच अनुभव घेतलेला असणार. असे असताना मी का बरे त्या संतवचनावर श्रध्दा ठेवू नये असा प्रश्न स्वत:ला विचारणे.
२. संत जे सांगतात त्यामागे नेहमी इतरांचे कल्याण व्हावे हा एकमेव हेतू असतो. त्यामागे त्यांचा काही एक स्वार्थ नसतो. असे असताना मी त्या संतवचनावर का बरे विश्वास ठेवू नये? असा प्रश्न स्वत:ला विचारणे.
३. सद्गुरू असे सांगतात की, जो दिवसभरात १००० वेळेला विश्वप्रार्थना करेल (जरी ती फावल्या वेळेत केलेली का असेना) त्याला ६ महिन्यात अनुभव यायला लागतील. यावर आपण आपल्याला असा प्रश्न विचारायचा की,
जर मी माझ्या जीवनातील फक्त ६ महिने प्रयोग म्हणून विश्वप्रार्थनेला दिले तर त्यामुळे माझे जास्तीत जास्त काय नुकसान होणार आहे? पण जर ६ महिने मी हा प्रयोग करण्यात यशस्वी झालो व त्यामुळे मला माझ्या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष अनुभवानेच मिळाले तर माझ्या उर्वरित जीवनात मला सुखाने कसे जगायचे व इतरांना सुख कसे द्यावयाचे हा प्रश्नच पडणार नाही. त्यामुळे उर्वरित जीवन फारच सोपे होणार आहे. तेव्हा चक्क नफा-तोटा पत्रक मांडायचे व जर फायदा होईल असे वाटले तर ६ महिन्याच्या प्रयोगाला सुरवात करायची. येथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. या ६ महिन्यात आपले कोणतेही कर्तव्यकर्म सोडण्याची जरुरी नाही. मात्र जे कार्य आपल्या कर्तव्यकर्मात मोडत नाही पण जे कार्य केल्याने १००० विश्वप्रार्थना करण्याच्या संकल्पाला बाधा येऊ शकते, अशा कार्यांचा त्याग करण्याची मनाची तयारी असली पाहिजे. ही तयारी असेल तर हा ६ महिन्यांचा कालावधी खूप छोटा वाटेल किंवा तसे नसेल तर हा कालावधी खूप मोठाही वाटू शकेल. आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्याची आपली तळमळ किती यावर ही मनाची तयारी अवलंबून असते. असो.
सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.