I have one query: What is the exact difference between 'bhala kar'and 'kalyan kar' in our prayer?
Both of them sound same to me.Please explain.
नमस्कार वर्षा,
भलं म्हणजे चांगले किंवा उत्कृष्ट.? पण यातून काहीतरी कळल्यासारखे वाटले तरी नीट अर्थबोध होत नाही.? माणसाने धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारही गोष्टींमध्ये पुरूषार्थ गाजवावा यासाठी सद्गुरू आपल्याला उपासना देत असतात.? ह्या चारही गोष्टींमधले जे जे चांगले किंवा उत्कृष्ट आहे ते ते सर्वांना प्राप्त होवो अशी प्रार्थना आपण "सर्वांचं भलं कर," असे म्हणून करत असतो.
पण कल्याण याचा अर्थ यापेक्षा थोडा वेगळा आहे.? आपली जर ज्ञानप्राप्तीची इच्छा असेल, (मग ते ज्ञान विज्ञानाचे असो किंवा अध्यात्माचे) तर त्या इच्छेला चांगली इच्छाच म्हणायला लागेल व त्यासाठी प्रयत्न करून ते ज्ञान प्राप्त करून घेणे, व त्या ज्ञानाच्या साह्याने आपले इप्सीत साध्य करून घेणे हे "सर्वांच भलं कर," यातूनच सूचित होते.? पण असे जरी असले तरी आपल्याला ती ज्ञानप्राप्ती होणे हे नेहमी आपल्या कल्याणाचेच असेल असे म्हणवत नाही.? उदाहरणार्थ-
लहान मुलाला एखादी वस्तू दिसली की ती हातात घेणे, तोंडात घालणे, आपटून पाहाणे वगैरे गोष्टींच्या साहाय्याने ते मूल त्या वस्तूचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची धडपड करत असते.? आता समजा एखादे रांगते मूल आहे.? देव्हाऱ्यातील समईकडे त्याचे लक्ष गेले आहे.? ती चकाकणारी पितळेची लख्ख समई, तिच्यातून प्रगट होणारी, थोडीशी थरथरणारी व हलणारी पिवळी धमक ज्योत यामुळे ते मूल त्या समईकडे जाऊ लागते.? पण त्याची आई त्याला समईकडे जाऊ देत नाही.? ती समई प्राप्त करून घेण्यासाठी त्याने जरी रडून आकांत केला तरी सुध्दा आई त्या मुलाला उचलून घेते पण त्या समई जवळ जाऊ देत नाही.? का?
समईचे अथवा तिच्यातील ज्योतीचे ज्ञान प्राप्त होणे यामध्ये त्या मुलाचे जरी भले असले तरी त्या मुलाचे वय पाहाता ते ज्ञान इतक्या रांगत्या वयात होणे त्याच्या कल्याणाचे नाही असे आईला वाटते.? पण थोडे कळू लागल्यावर मात्र तीच आई त्या लेकराला समई जवळ घेऊन जाते व त्याच्याशी बोलत बोलत त्याचे ज्ञान हळूहळू वाढविण्याचे प्रयत्न करते.
म्हणजे असे म्हणता येईल की "कल्याण कर," अशी प्रार्थना करत असताना त्या परमेश्वराच्या दृष्टीकोनातून जे कल्याणाचे आहे ते कर असे आपण म्हणत असतो.? किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, "कल्याण" या शब्दातून "भलं" सूचित होतेच पण त्यामध्ये परमेश्वराच्या दृष्टीकोनातून ते कल्याणाचे आहे किंवा नाही हे त्या परमेश्वरानेच तपासून पाहाण्याची अट आहे.
या कल्याण शब्दातूनच "जे घडते ते चांगल्यासाठीच" या विचारावर श्रध्दा उत्पन्न होते.? भरपूर प्रयत्न केल्यावर जेव्हां अपेक्षे एवढे यश मिळत नाही किंवा अपयश येते तेव्हां त्याचे खापर परिस्थितीवर फोडणे किंवा एखाद्या माणसाला त्यासाठी जबाबदार धरणे ही प्रवृत्ती कमी कमी होत जाऊन फक्त आपल्या चुका शोधायच्या व त्या दुरूस्त करायच्या ही वृत्ती वाढीस लागते.? प्राप्त परिस्थितीत आपण जे काही केले त्यात काहीही चूक नव्हती हे कळल्यावर मात्र असा माणूस "परमेश्वराची आत्ता यश देण्याची इच्छा नव्हती." असे समजून अनकूल परिस्थिती येईपर्यंत स्वस्थ बसतो.? यालाच तुकाराम महाराज म्हणतात.? ठेविले अनंते तैसेची राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ॥
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
शाम भागवत